कोल्हापूर : एकवेळ पाच वर्षे महापौरपदाशिवाय राहू, पण कोणत्याही परिस्थितीत काँग्रेससोबत आघाडी करणार नाही, अशी स्पष्ट भूमिका राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत मांडली. आमदार सतेज पाटील यांचे ‘फ्रंटडोअर’ काम संपले आहे, आता त्यांनी ‘बॅकडोअर’ काम करावे, असा सल्लाही त्यांनी दिला.
कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक आम्ही महायुती म्हणूनच लढलो. या निवडणुकीत एकीने काम केले. काही कटू तडजोडी केल्या, त्याग केला, महायुती अभेद्य ठेवण्याचा प्रयत्न केला म्हणूनच महापालिकेवर आमची सत्ता आली आहे. त्यामुळे येथून पुढे महापौर पदासह अन्य पदांच्या निवडणुकीतही आम्ही महायुती म्हणून एकत्र राहू, असे आमदार क्षीरसागर यांनी सांगितले.
महापौर महायुतीचेच होतील. परंतु पहिले भाजपचे की शिंदेसेनेचे याचा निर्णय आम्ही सर्व नेतेमंडळी एकत्र बसून निर्णय घेणार आहोत. महायुती म्हणून लढलो, आता महायुती म्हणून पदांचे वाटप होईल. तो नैसर्गिक अधिकार आहे, असे क्षीरसागर यांनी सांगितले.
हद्दवाढीची गोड बातमी लवकरच
आता देशात, राज्यात आणि महापालिकेत सत्ता महायुतीची आहे. त्यामुळे कोल्हापूरकरांची प्रदीर्घ काळाची मागणी असलेल्या हद्दवाढीबाबत गोड बातमी देऊ, अशी ग्वाहीदेखील क्षीरसागर यांनी यावेळी दिली.
बावड्यात बुथ कॅप्चर, बोगस मतदान
कसबा बावडा परिसरातून पराभूत झालेले आमचे उमेदवार मला भेटले. त्या परिसरातील प्रत्येक मतदान केंद्रावर बुथ कॅप्चर झाले, बोगस मतदान झाले, दादागिरी करण्यात आली. त्यामुळेच काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले, असा आरोपही क्षीरसागर यांनी केला.
निगेटिव्ह नरेटिव्ह तयार करण्यात बादशहा असलेल्या सतेज पाटील यांनी काही प्रभागात ही निवडणूक जातीयवादी करण्याचा प्रयत्न केला. अंबाबाई मंदिराला अजगराचा विळखा पडल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. मग आम्ही कशाला आहोत? कोणताही विळखा अंबाबाई मंदिराला पडणार नाही, असे क्षीरसागर यांनी सांगितले.
महायुती म्हणून लढताना कार्यकर्त्यांवर अन्याय
महायुती म्हणून लढताना आमच्या काही कार्यकर्त्यांवर अन्याय झाला आहे. हा अन्याय अन्य मार्गाने भरुन काढण्यात येईल. स्वीकृत नगरसेवक, महामंडळ, जिल्हास्तरीय समित्या आहेत, त्यावर नाराजांची वर्णी लावून त्यांची नाराजी दूर केली जाईल, असेही ते म्हणाले.
महापौर एकत्र ठरविणार
महापौर पदाचे आरक्षण आज, गुरुवारी असून, आरक्षण पडते यावर कोणाचे महापौर, कोण महापौर, कोणाला पहिली संधी द्यायची हे ठरविले जाईल, असे क्षीरसागर यांनी सांगितले.
Web Summary : Rajesh Kshirsagar clarified that alliance with Congress is impossible, even at cost of Mayor post. Mahayuti will decide Mayor, address worker grievances, and deliver Kolhapur's expansion soon. He alleged booth capturing in Bawda.
Web Summary : राजेश क्षीरसागर ने स्पष्ट किया कि कांग्रेस से गठबंधन असंभव है, भले ही महापौर पद की कीमत चुकानी पड़े। महायुति महापौर तय करेगी, कार्यकर्ताओं की शिकायतों का निवारण करेगी और जल्द ही कोल्हापुर का विस्तार करेगी। उन्होंने बावड में बूथ कैप्चरिंग का आरोप लगाया।