'झुला झुल, पर बाप को...'; पोलिसांना सोशल मीडियावर ललकारणाऱ्या दोन भावांना 'खाकी हिसका'
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 11:58 IST2026-05-08T11:58:14+5:302026-05-08T11:58:14+5:30
पोलिसांना चॅलेंज देणाऱ्या सोशल मीडिया स्टार्सची जाफराबाद पोलिसांनी काढली 'हवा'

'झुला झुल, पर बाप को...'; पोलिसांना सोशल मीडियावर ललकारणाऱ्या दोन भावांना 'खाकी हिसका'
जाफराबाद (जि. जालना) : कायद्याचे रक्षण करणाऱ्या पोलिसांना सोशल मीडियावरून खुल्लमखुल्ला आव्हान देणाऱ्या दोन भावांना जाफराबाद पोलिसांनी गुरुवारी चांगलाच 'खाकी हिसका' दाखवला आहे. पोलिसांविरुद्ध प्रक्षोभक स्टेटस ठेवून 'भाईगिरी' करणाऱ्या कैलास राणुबा बकाल आणि परमेश्वर बकाल या दोघांची पोलिसांनी अशी काही 'हवा' काढली की, संपूर्ण तालुक्यात याची चर्चा रंगली आहे.
देऊळझरी येथील अवैध वाळू उपसा करणाऱ्या ट्रॅक्टरवर पोलिसांनी कारवाई केली होती. न्यायालयाच्या आदेशानंतर जेसीबी आणि ट्रॅक्टर सोडण्यात आले होते. जप्त केलेली वाहने जेव्हा पोलिस ठाण्यातून बाहेर पडत होती, तेव्हा त्यांचा व्हिडीओ काढून त्यावर ‘आम्ही कोणालाही घाबरत नाही,’ अशा अर्थाची चिथावणीखोर गाणी आणि संवाद लावून तो स्टेटसवर ठेवला. त्यानंतर पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेऊन चांगलाच चोप दिला. शिवाय भावंडांचा माफीनाम्याचा व्हिडीओही आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रकरणात पो.हे.कॉ. प्रभाकर डोईफोडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून कैलास बकाल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. चौकशीत प्रवीण बकाल यालाही ताब्यात घेतले होते.
पोलिसांनी जिरवली 'भाईगिरी'! सोशल मीडियावर पोलिसांना ललकारणाऱ्या दोन भावांना 'खाकी हिसका'; माफी मागतानाचा व्हिडीओ व्हायरल. #jalana#marathwada#crimenewspic.twitter.com/tGugfvgV0V
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) May 8, 2026
‘स्टेटस’ ठेवले अन् ‘वर्चस्व’ संपले!
आरोपींनी स्टेटसवर अत्यंत खालच्या पातळीची भाषा वापरत, ‘झुला झुुल, पर बाप को मत भूल...’ असे म्हणत थेट पोलिसांनाच ललकारले होते. हा प्रकार जाफराबाद पोलिसांच्या लक्षात येताच त्यांनी या 'सोशल मीडिया स्टार्स'चा शोध सुरू केला. पोलिसांनी या दोघांनाही उचलून पोलिस ठाण्यात आणले आणि तिथेच त्यांची सर्व 'हिरोगिरी' क्षणात गायब झाली.
कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही
सोशल मीडियाचा वापर हा समाज जोडण्यासाठी करा, कायद्याचे उल्लंघन किंवा पोलिसांची प्रतिमा मलिन करण्यासाठी केल्यास त्याचे परिणाम गंभीर होतील. कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही, हे या कारवाईतून स्पष्ट करण्यात आले आहे.
-संतोष जाधव, पोलिस निरीक्षक, जाफराबाद