इराण युद्धासाठी ट्रम्प सरकारचा मोठा प्लॅन! पेंटागॉनने मागितले २०० अब्ज डॉलर्स; अमेरिकन काँग्रेसच्या निर्णयाकडे जगाचे लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 07:40 IST2026-03-20T07:39:41+5:302026-03-20T07:40:49+5:30
Trump Admin Pentagon Iran War Funding : इराण युद्धासाठी डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने पेंटागॉनमार्फत २०० अब्ज डॉलर्सची मागणी केली आहे. अमेरिकन काँग्रेसमध्ये यावर खडाजंगी होण्याची शक्यता.

इराण युद्धासाठी ट्रम्प सरकारचा मोठा प्लॅन! पेंटागॉनने मागितले २०० अब्ज डॉलर्स; अमेरिकन काँग्रेसच्या निर्णयाकडे जगाचे लक्ष
वॉशिंग्टन : इराणसोबतच्या वाढत्या लष्करी तणावादरम्यान, अमेरिकेचे संरक्षण मंत्रालय (पेंटागॉन) आक्रमक भूमिकेत दिसू लागले आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील प्रशासनाने इराणयुद्धाशी संबंधित संभाव्य खर्चासाठी २०० अब्ज डॉलर्स (सुमारे १६.६ लाख कोटी रुपये) इतक्या भरघोस अतिरिक्त निधीची मागणी केली आहे. हा प्रस्ताव संसदेच्या (काँग्रेस) मंजुरीसाठी पाठवण्यात आला असून, यावरून आता अमेरिकेत राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी नेहमीच इराणच्या विरोधात कडक पावले उचलण्याचे संकेत दिले आहेत. पेंटागॉनच्या या मागणीमुळे अमेरिका आता इराणविरोधात निर्णायक भूमिकेत असल्याचे स्पष्ट होत आहे. संरक्षण सचिव पीटर हेगसेथ यांनी या निधीचे समर्थन करताना म्हटले आहे की, "शत्रूचा नायनाट करण्यासाठी आणि अमेरिकेचे वर्चस्व टिकवण्यासाठी हा खर्च आवश्यक आहे."
काँग्रेसमध्ये पेच निर्माण होणार?
२०० अब्ज डॉलर्स ही एक मोठी रक्कम आहे. ट्रम्प प्रशासनाला या निधीसाठी अमेरिकन काँग्रेसमध्ये जोरदार संघर्षाचा सामना करावा लागू शकतो. विरोधकांकडून या निधीच्या विनियोगावर आणि युद्धाच्या परिणामांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. जर हा निधी मंजूर झाला, तर मध्य पूर्वेतील युद्धाचे चित्र पूर्णपणे बदलू शकते.
इराण आणि इस्रायलमधील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक अत्यंत महत्त्वपूर्ण विधान केले आहे. "मी सध्या इराणमध्ये सैन्य तैनात करण्याचा कोणताही विचार करत नाहीये," असे स्पष्ट करत त्यांनी युद्धाच्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, त्याच वेळी इराणचे नेतृत्व आता संपुष्टात आले असून, जगाने संरक्षणाची जबाबदारी स्वतः उचलली पाहिजे, अशी रोखठोक भूमिकाही त्यांनी मांडली आहे. इराण हे संपूर्ण जगासाठी, विशेषतः मध्यपूर्वेसाठी एक मोठे संकट आहे. त्यांनी स्पष्ट केले की, अमेरिकेने योग्य वेळी उचललेले पाऊल जगाला सुरक्षित करेल. यावेळी त्यांनी जपानसारख्या देशांना खडे बोल सुनावले. ट्रम्प म्हणाले, "जपानच्या तेल आयातीचा ९०% हिस्सा ज्या 'स्ट्रेट ऑफ होर्मुज' मधून येतो, त्याच्या सुरक्षेची जबाबदारी आता जपानने स्वतः घेतली पाहिजे. अमेरिका एकटा किती काळ सर्वांचे रक्षण करणार?"
आर्थिक यशाचा दाखला आणि ब्रिटनला टोला
यावेळी ट्रम्प यांनी त्यांच्या कार्यकाळातील आर्थिक यशाचीही पाठ थोपटून घेतली. 'डाऊ जोन्स' ५०,००० च्या पार आणि 'एस अँड पी' ७,००० च्या पुढे नेण्याचे उद्दिष्ट आपण फक्त एका वर्षात साध्य केल्याचे त्यांनी सांगितले. दुसरीकडे, ब्रिटनने विमानवाहू युद्धनौका पाठवण्याच्या चर्चेवर ट्रम्प यांनी खोचक टिप्पणी केली. "आम्हाला त्यांची गरज युद्धापूर्वी होती, युद्ध जिंकल्यानंतर नाही," असे म्हणत त्यांनी नाटो देशांच्या भूमिकेवरही नाराजी व्यक्त केली.
इस्रायलला महत्त्वाची सूचना
ट्रम्प यांनी खुलासा केला की, त्यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना इराणमधील तेल आणि ऊर्जा क्षेत्रांवर हल्ला न करण्याचा सल्ला दिला आहे. परिस्थिती लवकरच सामान्य होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.