भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 20:59 IST2025-06-15T20:55:09+5:302025-06-15T20:59:28+5:30
ट्रम्प यांनी बायडन प्रशासनाच्या धोरणांवरही टीका केली. बायडन यांनी काही प्रमाणात मुर्खपणाचे निर्णय घेतले त्यातून दीर्घकालीन नुकसान उचलावे लागले आहे

भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
इराण आणि इस्त्रायल या दोन्ही देशात युद्ध सुरू आहे. त्यातच इराणने ओमानची राजधानी मस्कट येथे अमेरिकेसोबत होणारी न्यूक्लियर चर्चाही रद्द केली आहे. इस्त्रायलसोबतच्या युद्धाला इराण थेटपणे अमेरिकेला जबाबदार मानत आहे. त्यातच रविवारी डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा दावा केला. इराण आणि इस्त्रायल यांच्यात करार करायला हवा, तो आम्ही करू असं त्यांनी म्हटलं आहे.
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, ज्याप्रकारे भारत आणि पाकिस्तानसोबत मी केले तसेच इराण-इस्त्रायलमध्ये करू. अमेरिकेसोबत व्यापाराचा वापर करून दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा करून तर्कशुद्ध सामंजस्य आणि शांतता आणता येऊ शकते. त्यातून लवकरात लवकर निर्णय घेणे आणि युद्ध रोखण्याची क्षमता आहे. सर्बिया आणि कोसोवो यांच्यात कित्येक दशके आरोप प्रत्यारोप सुरू होते. दीर्घकाळ चालणारा हा संघर्ष युद्धात रुपांतरित होणार होता. परंतु माझ्या पहिल्या कार्यकाळात मी ते रोखले असं त्यांनी सांगितले.
तसेच ट्रम्प यांनी बायडन प्रशासनाच्या धोरणांवरही टीका केली. बायडन यांनी काही प्रमाणात मुर्खपणाचे निर्णय घेतले त्यातून दीर्घकालीन नुकसान उचलावे लागले आहे. परंतु मी पुन्हा हे सर्व सुरळीत करेन. मिस्त्र आणि इथियोपिया यांच्यातीलही एक मुद्दा आहे. जिथे ते एका मोठ्या धरणावरून ते भांडतात, ज्याचा नील नदीवर परिणाम होत होता. तेही माझ्या हस्तक्षेपामुळे थांबले. कमीत कमी सध्या तरी दोन्ही देशांत शांतता आहे आणि ते पुढेही राहील असंही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं.
दरम्यान, इराण आणि इस्त्रायल यांच्यात लवकरच अशाप्रकारे शांतता प्रस्थापित होईल. इराण-इस्त्रायलचा उल्लेख करत ट्रम्प यांनी मला अनेक कॉल येतायेत, मीटिंग सुरू आहेत. मी खूप काही करत असतो परंतु कुठल्याही गोष्टीचे श्रेय घेत नाही. हा ते लोकांना कळते असा दावाही डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे.