मोठी बातमी! होर्मुजच्या खाडीत युद्धनौका पाठविणार; इराणच्या विरोधात ब्रिटन, जपानसह ६ देश एकत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 08:20 IST2026-03-20T08:19:44+5:302026-03-20T08:20:11+5:30
Strait of Hormuz blockade: इराणच्या हल्ल्यांमुळे होर्मुज सामुद्रधुनीतील वाहतूक ठप्प. ब्रिटन, जपान आणि युरोपियन देशांचा इराणला इशारा. जागतिक इंधन पुरवठा धोक्यात. वाचा सविस्तर.

मोठी बातमी! होर्मुजच्या खाडीत युद्धनौका पाठविणार; इराणच्या विरोधात ब्रिटन, जपानसह ६ देश एकत्र
इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्थेची जीवनवाहिनी मानली जाणारी 'होर्मुजची सामुद्रधुनी' सध्या मृत्यूचा सापळा बनली आहे. इराणने व्यापारी जहाजांवर ड्रोन आणि स्फोटक बोटींनी हल्ले सुरू केल्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. या पार्श्वभूमीवर ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, इटली, नेदरलँड आणि जपान या सहा प्रमुख देशांनी संयुक्त निवेदन जारी करून इराणला कडक इशारा दिला आहे.
होर्मुज सामुद्रधुनीतून जगातील कच्च्या तेलाचा आणि एलपीजीचा मोठा पुरवठा होतो. इराणच्या हल्ल्यांमुळे शेकडो जहाजे या मार्गाबाहेर अडकून पडली आहेत. याचा थेट परिणाम भारत, जपान आणि युरोपातील इंधन पुरवठ्यावर झाला आहे. या सहा देशांनी स्पष्ट केले आहे की, ऊर्जा पुरवठा साखळीतील हा अडथळा आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेसाठी थेट धोका आहे.
कतारच्या नुकसानीचा जागतिक फटका
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, या देशांनी कतार आणि सौदी अरेबियातील तेल व गॅस प्रकल्पांवरील हल्ल्यांचा तीव्र निषेध केला आहे. 'कतार एनर्जी'ने आधीच स्पष्ट केले आहे की, त्यांच्या १७% एलएनजी निर्यात क्षमतेवर परिणाम झाला असून वार्षिक २० अब्ज डॉलर्सचा फटका बसणार आहे. या नुकसानीमुळे जागतिक बाजारात गॅसचे दर गगनाला भिडण्याची भीती निर्माण झाली आहे.
सामुद्रिक सुरक्षेसाठी लष्करी सज्जता?
संयुक्त निवेदनात या देशांनी म्हटले आहे की, ते या महत्त्वाच्या समुद्री मार्गावरून जहाजांची सुरक्षित वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी 'समन्वित प्रयत्न' करण्यास तयार आहेत. याचा अर्थ असा लावला जात आहे की, आता हे देश आपली युद्धनौका होर्मुजमध्ये इराणच्या विरोधात तैनात करू शकतात. "इराणच्या या कृत्याचा परिणाम जगाच्या प्रत्येक कोपऱ्यातील माणसावर, विशेषतः गरीब वर्गावर होईल," असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
प्रभावित देशांशी एकजुटता
युरोपियन कौन्सिलने इराणच्या हल्ल्यांचा बळी ठरलेल्या आखाती देशांशी (जसे की बहरीन, कुवेत, कतार, सौदी अरेबिया) आपली एकजुटता व्यक्त केली आहे. "प्रादेशिक शांतता आणि स्थिरता धोक्यात आणणाऱ्या कोणत्याही कृतीचे समर्थन केले जाणार नाही," असे युरोपियन नेत्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच, 'स्ट्रेट ऑफ होर्मुज' मधील जहाजांची वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने एकत्र येण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
ट्रम्प यांनी जपानलाही सुनावले
माध्यमांशी संवाद साधताना ट्रम्प म्हणाले की, इराण हे संपूर्ण जगासाठी, विशेषतः मध्यपूर्वेसाठी एक मोठे संकट आहे. त्यांनी स्पष्ट केले की, अमेरिकेने योग्य वेळी उचललेले पाऊल जगाला सुरक्षित करेल. यावेळी त्यांनी जपानसारख्या देशांना खडे बोल सुनावले. ट्रम्प म्हणाले, "जपानच्या तेल आयातीचा ९०% हिस्सा ज्या 'स्ट्रेट ऑफ होर्मुज' मधून येतो, त्याच्या सुरक्षेची जबाबदारी आता जपानने स्वतः घेतली पाहिजे. अमेरिका एकटा किती काळ सर्वांचे रक्षण करणार?"