Hingoli: पिकाला पाणी देण्याची धडपड ठरली जीवघेणी; वडिलांच्या डोळ्यादेखत तरुण कालव्यात बुडाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 16:43 IST2026-05-13T16:42:30+5:302026-05-13T16:43:30+5:30
Hingoli Drowning Accident: कालव्यापलीकडे पाईप नेताना दोरीचा विळखा बसला अन् घात झाला; वसमतमध्ये कालव्यात बुडून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू.

Hingoli: पिकाला पाणी देण्याची धडपड ठरली जीवघेणी; वडिलांच्या डोळ्यादेखत तरुण कालव्यात बुडाला
वसमत (जि. हिंगोली): शेतातील चारा पिकाला पाणी मिळावे यासाठी धडपड करणाऱ्या गणेशपूर येथील बामणाजी वाघमारे (वय ३८) या तरुण शेतकऱ्याचा कालव्यात बुडून मृत्यू झाला आहे. ७ मे रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. कालव्यामुळे शेतीचे दोन भाग झाल्याने पाईप पलीकडे नेण्याची कसरत करताना हा अपघात झाला.
नेमकी घटना काय?
बामणाजी यांच्या शेतातून कालवा गेल्यामुळे पिकाला पाणी देण्यासाठी त्यांना पाईप कालव्याच्या दुसऱ्या बाजूला न्यावा लागत असे. ७ मे रोजी पाईप ओढण्यासाठी त्यांनी दोरीचा वापर केला होता. मात्र, ही दोरी अचानक त्यांच्या हात आणि पायात अडकली. बामणाजी यांना पोहता येत नसल्याने आणि दोरीचा विळखा घट्ट बसल्याने ते पाण्यात ओढले गेले.
वडिलांच्या डोळ्यादेखत दुर्घटना
हा सर्व प्रकार बामणाजी यांच्या वडिलांच्या समोर घडला. त्यांनी मदतीसाठी आरडाओरड केली, मात्र तोपर्यंत बामणाजी यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. या घटनेमुळे वाघमारे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, घरातील कर्ता पुरुष गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.