मधुमेह होऊन ५ वर्षे झालीत? 'सायलेंट डॅमेज' टाळण्यासाठी करा या चाचण्या !
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 19:38 IST2026-05-04T19:35:35+5:302026-05-04T19:38:59+5:30
Chandrapur : मधुमेह हा असा आजार आहे, जो शरीराच्या प्रत्येक अवयवावर हळूहळू परिणाम करतो. विशेषतः ज्या रुग्णांना मधुमेह होऊन ५ वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला आहे, त्यांनी केवळ साखरेची पातळी न तपासता शरीराच्या इतर महत्त्वाच्या अवयवांचे कार्य नियमितपणे तपासणे गरजेचे आहे.

Have you had diabetes for 5 years? Get these tests done to prevent 'silent damage'!
चंद्रपूर : मधुमेह हा असा आजार आहे, जो शरीराच्या प्रत्येक अवयवावर हळूहळू परिणाम करतो. विशेषतः ज्या रुग्णांना मधुमेह होऊन ५ वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला आहे, त्यांनी केवळ साखरेची पातळी न तपासता शरीराच्या इतर महत्त्वाच्या अवयवांचे कार्य नियमितपणे तपासणे गरजेचे आहे. दुर्लक्ष केल्यास हृदयविकार, किडनी निकामी होणे किंवा अंधत्व येण्याचा धोका असतो. त्यामुळे वेळीच योग्य चाचण्या करणे गरजेचे आहे, असा सल्ला कार्डिओलॉजिस्ट डॉ. प्रदीप वरघणे यांनी केले आहे.
हृदयविकाराचा वाढता धोका
मधुमेहामुळे रक्तवाहिन्या कडक होतात, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता बळावते. यासाठी दरवर्षी एकदा डोळ्याची पडदा तपासणी आणि पायांच्या संवेदना तपासणे गरजेचे आहे.
वेळेनुसार चाचण्यांचे नियोजन आवश्यक
मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यासाठी चाचण्यांचे वेळापत्रक पाळणे हिताचे ठरते. दर महिन्याला उपाशीपोटी आणि जेवणानंतरची साखर तपासणे अनिवार्य आहे, तर दर तीन महिन्यांनी 'HbA1c' ही चाचणी करून मागील ९० दिवसांतील साखरेची सरासरी पातळी जाणून घ्यावी. याशिवाय रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण तपासण्यासाठी दर सहा महिन्यांनी "लिपिड प्रोफाइल' आणि किडनीच्या आरोग्यासाठी 'क्रिएटिनिन' चाचणी करणे आवश्यक आहे.
कौटुंबिक इतिहास असेल तर घ्या काळजी!
कुटुंबात आई-वडिलांना मधुमेह, रक्तदाब किंवा हृदयविकाराचा इतिहास असल्यास तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने नियमितपणे 'हेल्थ चेकअप' करून घ्यावे. अनुवांशिक आजारांचा धोका टाळण्यासाठी सकस आहार, नियमित व्यायाम आणि निरोगी जीवनशैलीचा अवलंब करणे अत्यंत आवश्यक आहे.
ही आहेत धोक्याची लक्षणे
पायांना सतत मुंग्या येणे किंवा जळजळ होणे, दृष्टी धूसर होणे किंवा डोळ्यांचा नंबर वारंवार बदलणे, लघवीच्या प्रमाणात बदल होणे किंवा अंगावर सूज येणे, साखर वारंवार अनियंत्रित होणे.
तज्ज्ञ काय म्हणतात ?
"मधुमेह हा केवळ रक्तातील साखरेचा आकडा नाही, तर तो संपूर्ण शरीराशी निगडित आजार आहे. ५ वर्षांहून अधिक काळ मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये हृदयविकाराचा धोका इतरांपेक्षा जास्त असतो. अनेकदा कोणतीही लक्षणे न दिसता हृदय किंवा किडनीवर परिणाम होऊ शकतो, ज्याला आपण 'सायलेंट डॅमेज' म्हणतो. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दर ३ ते ६ महिन्यांनी लिपिड प्रोफाइल, किडनी फंक्शन टेस्ट आणि गरज पडल्यास ईसीजी करणे आरोग्यासाठी सुरक्षित ठरते.
- डॉ. प्रदीप वरघणे, कार्डिओलॉजिस्ट, चंद्रपूर