स्मार्ट होम की मृत्यूचा सापळा? आग लागताच स्मार्ट लॉक खराब; दरवाजा न उघडल्याने ९ जणांचा बळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 13:40 IST2026-05-05T13:39:26+5:302026-05-05T13:40:13+5:30
एसी (AC) ब्लास्ट किंवा शॉर्ट सर्किट हे आगीचं कारण मानलं जात आहे. मात्र या दुर्घटनेत आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे, ती म्हणजे 'स्मार्ट डोअर लॉक'चं अपयश.

स्मार्ट होम की मृत्यूचा सापळा? आग लागताच स्मार्ट लॉक खराब; दरवाजा न उघडल्याने ९ जणांचा बळी
दिल्लीतील विवेक विहार येथे घडलेल्या आगीच्या घटनेने पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केला आहे की, आपली घरं खरोखर सुरक्षित आहेत का? एका निवासी इमारतीला सकाळी आग लागली आणि बघता बघता ९ निष्पाप जीवांचा बळी गेला. प्राथमिक तपासात एसी (AC) ब्लास्ट किंवा शॉर्ट सर्किट हे आगीचं कारण मानलं जात आहे. मात्र या दुर्घटनेत आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे, ती म्हणजे 'स्मार्ट डोअर लॉक'चं अपयश.
काय आहे स्मार्ट डोअर लॉक?
आजकाल बाजारपेठेत स्मार्ट डोअर लॉक्सची मोठी विक्री होत आहे. पारंपारिक कुलूपांच्या जागी हे लॉक लावलं जातं. ई-कॉमर्स वेबसाइट्सपासून दुकानांपर्यंत ते सहज उपलब्ध आहेत. हे लॉक ॲपद्वारे, कार्डद्वारे किंवा पिन कोड सेट करून उघडता येतात. काही स्मार्ट लॉक फिंगरप्रिंटवर चालतात, तर काही ओटीपी (OTP) द्वारे उघडतात. सुरक्षेसाठी यात अनेक फीचर्स दिले जातात, परंतु भारतात उपलब्ध असलेले अनेक स्मार्ट लॉक्स आग लागल्यासारख्या आपत्कालीन परिस्थितीत निकामी होतात.
आग लागली, तिथे इलेक्ट्रॉनिक स्मार्ट डोअर लॉक
मिळालेल्या माहितीनुसार, ज्या मजल्यावर आग लागली तिथे इलेक्ट्रॉनिक स्मार्ट डोअर लॉक सिस्टमने काम करणं बंद केलं होतं. जसा वीजपुरवठा खंडित झाला आणि आग पसरली, तसे दरवाजे जाम झाले. लोक आत अडकले आणि बाहेर पडण्याचे सर्व मार्ग बंद झाले. काही लोक दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत राहिले, पण सिस्टम प्रतिसाद देत नव्हती. यामुळे अनेक लोक धूर आणि आगीत अडकले. हा अपघात केवळ शॉर्ट सर्किटमुळे लागलेली आग नव्हती, तर अनेक छोट्या चुकांचा एकत्रित परिणाम होता.
इमारतीच्या खिडक्यांना लोखंडी ग्रील्स बसवण्यात आले होते, ज्यामुळे लोकांना बाहेर पडता आले नाही. छताचा दरवाजाही बंद होता, जो आपत्कालीन मार्ग (Emergency Exit) ठरू शकला असता. संपूर्ण इमारतीत येण्या-जाण्यासाठी एकच मार्ग होता. जेव्हा आग पसरली, तेव्हा धूर वेगाने वर गेला आणि लोकांकडे वाचण्यासाठी दुसरा कोणताही पर्याय उरला नाही.
स्मार्ट डोअर लॉक किती सुरक्षित?
आता प्रश्न असा निर्माण होत आहे की, स्मार्ट डोअर लॉकसारखं तंत्रज्ञान अशा परिस्थितीत धोकादायक ठरू शकतं का? शहरांमध्ये स्मार्ट लॉक्सची लोकप्रियता वाढत आहे. विनाकिल्ली दरवाजा उघडणं, मोबाईलवरून नियंत्रण मिळवणं किंवा फिंगरप्रिंटने प्रवेश करणं या सुविधा लोकांना आकर्षित करतात. चोरांपासून संरक्षण करण्यासाठीही हे सुरक्षित मानले जातात.
आगीसारख्या आणीबाणीच्या प्रसंगी चित्र बदलतं. बहुतेक स्मार्ट लॉक वीज किंवा बॅटरीवर चालतात. जर शॉर्टसर्किट झालं, सिस्टम हँग झाली किंवा बॅटरी संपली, तर दरवाजा उघडणं कठीण होतं. काही लॉक्समध्ये 'मॅन्युअल ओव्हरराइड' (हाताने उघडण्याची सोय) असते, पण अनेकदा घाबरलेले लोक त्याचा वापर करू शकत नाहीत किंवा ते नीट काम करत नाही.
तज्ज्ञांचे मत काय?
अग्निशमन तज्ज्ञांच्या मते, कोणत्याही घरात किंवा इमारतीत तंत्रज्ञानासोबतच मूलभूत सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष करू नये. जर दरवाजा इलेक्ट्रॉनिक असेल, तर त्यात मॅन्युअल लॉकचा पर्याय असणे अनिवार्य आहे. आपत्कालीन स्थितीत वीज नसतानाही दरवाजा उघडता आला पाहिजे. याशिवाय घरात एकापेक्षा जास्त बाहेर पडण्याचे मार्ग असणं आवश्यक आहे.
जर तुमच्या घरात स्मार्ट लॉक असेल, तर त्यात मॅन्युअल चावीचा पर्याय आहे का, हे नक्की तपासा. वीज गेल्यावर तो उघडतो का? घरातून बाहेर पडण्यासाठी दुसरा मार्ग आहे का? खिडक्यांतून बाहेर पडता येईल का? हे छोटे प्रश्नच मोठ्या संकटातून वाचवू शकतात.
दिल्लीच्या या घटनेने हे सिद्ध केलं आहे की, केवळ स्मार्ट लॉकच नाही तर इमारतीचे नियोजनही महत्त्वाचं असतं. जर खिडक्यांना ग्रील्स असतील, रस्ता बंद असेल आणि पायऱ्यांचा एकच मार्ग असेल, तर आगीच्या वेळी परिस्थिती अत्यंत भयानक होते. धूर हा सर्वात मोठा धोका असतो जो काही मिनिटांत माणसाला बेशुद्ध करू शकतो. गेल्या काही वर्षांत एसी ब्लास्ट आणि इलेक्ट्रिकल आगीच्या घटना वाढल्या आहेत. उन्हाळ्यात लोड वाढल्यामुळे वायरिंग गरम होऊन धोका वाढतो. अशा वेळी घरात अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणं असल्यास जोखीम अधिक वाढते.