बनावट जन्म दाखला घोटाळा: मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून SITद्वारे सखोल चौकशीचे आदेश
By मनीषा म्हात्रे | Updated: May 5, 2026 13:15 IST2026-05-05T13:13:16+5:302026-05-05T13:15:28+5:30
मुंबई: खोट्या कागदपत्रांच्या आधारे बनावट जन्म नोंदणी प्रमाणपत्रे लाटणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश मुंबई पोलिसांनी केला असून, या प्रकरणाच्या ...

बनावट जन्म दाखला घोटाळा: मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून SITद्वारे सखोल चौकशीचे आदेश
मुंबई: खोट्या कागदपत्रांच्या आधारे बनावट जन्म नोंदणी प्रमाणपत्रे लाटणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश मुंबई पोलिसांनी केला असून, या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी आता विशेष तपास पथकाची (SIT) नियुक्ती करण्यात आली आहे. या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्याचे लक्षात घेऊन मुंबई पोलीस आयुक्तांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
नेमके काय आहे बनावट जन्म दाखला घोटाळा प्रकरण?
मुंबईत बनावट दस्तऐवजांच्या आधारे चुकीची जन्म प्रमाणपत्रे मिळवण्याचे प्रकार घडत असल्याचे गुन्हे शाखेच्या (Crime Branch) तपासात समोर आले होते. प्राप्त तक्रारी आणि प्राथमिक चौकशीनुसार, अशा पद्धतीने मिळवलेल्या प्रमाणपत्रांची संख्या प्रचंड मोठी असल्याचे निदर्शनास आले आहे. हे प्रकरण केवळ फसवणुकीपुरते मर्यादित नसून त्याचे गांभीर्य अधिक असल्याने विशेष पथकामार्फत चौकशी केली जाणार आहे.
तपास पथकाची रचना
या गुन्ह्यांचा प्रभावी आणि तांत्रिक तपास करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या 'SIT' मध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. पोलीस सह आयुक्त (गुन्हे) हे समितीचे अध्यक्ष असतील. तर अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), अपर पोलीस आयुक्त (विशेष शाखा) आणि पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण - १, गुन्हे) हे समितीतल सदस्य असतील.
तपासाची दिशा
विशेष तपास पथक केवळ प्रमाणपत्रे मिळवणाऱ्यांचीच नव्हे, तर ही बनावट कागदपत्रे तयार करून देणाऱ्या टोळ्या आणि त्यामागील सूत्रधारांचाही शोध घेणार आहे. या घोटाळ्यात कोणत्याही शासकीय यंत्रणेचा किंवा मध्यस्थांचा सहभाग आहे का, याचाही सखोल तपास केला जाणार आहे. बनावट जन्म दाखला मिळवणे हा गंभीर स्वरूपाचा फौजदारी गुन्हा असून, नागरिकांनी अशा कोणत्याही बेकायदेशीर मार्गाचा अवलंब करू नये, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे.