गोंदियात अवकाळी पाऊस, गारपिटीने केले १३८९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 20:13 IST2026-05-07T20:11:34+5:302026-05-07T20:13:47+5:30

गोरेगाव तालुक्याला बसला सर्वाधिक फटका : शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावला

Unseasonal rains, hailstorms damage crops on 1389 hectares in Gondia | गोंदियात अवकाळी पाऊस, गारपिटीने केले १३८९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान

Unseasonal rains, hailstorms damage crops on 1389 hectares in Gondia

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया :
जिल्ह्यात मंगळवारी (दि.५) गारपीट व वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने सर्वत्र हजेरी लावली. यामुळे रब्बी हंगामातील धान, मका आणि भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कृषी विभागाने सादर केलेल्या प्राथमिक अंदाजानुसार जिल्ह्यातील १३८९ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले असून सर्वाधिक नुकसान हे गोरेगाव तालुक्यात झाले आहे. तर बुधवारी (दि.६) सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने नुकसानीच्या आकड्यात वाढ होण्याची शक्यता असून, शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावल्याने त्यांच्यावर संकट ओढवले आहे. 

गेल्या खरीप हंगामात कीडरोग आणि परतीच्या पावसामुळे धानपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे खरिपात झालेले नुकसान रब्बीत भरून काढू, या आशेने जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी रब्बी धानाची लावगड केली. त्यामुळेच यंदा रब्बीचे लागवड क्षेत्र ७६ हजार हेक्टरवर पोहोचले. तर काही शेतकऱ्यांनी धानाला पर्याय म्हणून ७०० हेक्टरवर मका पिकाची लागवड केली होती. रब्बीतील धान आणि मका पिकाला अनुकूल वातावरण मिळाल्याने दोन्ही पिके चांगली आली होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव होते. 

मका पिकाची कापणी आणि मळणी सुरू आहे, तर रब्बीतील धानपीक निघण्याच्या मार्गावर आहे. मात्र, पुन्हा शेतकऱ्यांवर निसर्ग कोपल्याने शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावला आहे. हवामान विभागाने जिल्ह्यात ४ ते ९ एप्रिलदरम्यान वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविला होता. तो अंदाज खरा ठरला. मंगळवारी दुपारी जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जिल्ह्यात सर्वत्र हजेरी लावली. तर गोरेगाव, देवरी, गोंदिया तालुक्यात गारपीट झाली. वादळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतातील उभा धान आडवा झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर बुधवारी (दि.६) सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने रब्बीतील पिकांच्या नुकसानीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

पंचनामा करून नुकसानभरपाई द्या

अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे धानपिकासह मका आणि भाजीपाला पिकांचेसुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई जाहीर करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

वाळविलेला मका भिजला, विक्री करणार कसा?

अनेक शेतकऱ्यांनी मका पिकाची कापणी आणि मळणी करून तो विक्री करण्यासाठी वाळवत घातला होता. मंगळवारी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे मका भिजल्याने तो खराब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा मका आता विक्री करायचा कसा आणि लागवड खर्च भरून काढायचा कसा? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.

धानाच्या कडपा भिजल्या, पाखड होण्याची शक्यता

गोरेगाव तालुक्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने १ हजार हेक्टरमधील रब्बी धानपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांनी धानाची कापणी करून ठेवली होती. त्या कापणी केलेल्या धानाच्या कडपा भिजल्याने धान पाखड होण्याची शक्यता असून, शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.

"मंगळवारी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे सर्वाधिक नुकसान हे गोरेगाव तालुक्यातील पिकांचे झाले आहे. तर बुधवारीसुद्धा अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने नुकसानीच्या आकड्यात वाढ होण्याची शक्यता आहे. नुकसानीचे पंचनामे केले जात आहे."
- नीलेश कानवडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, गोंदिया

Web Title : गोंदिया: बेमौसम बारिश और ओलावृष्टि से 1389 हेक्टेयर फसलें बर्बाद

Web Summary : गोंदिया में बेमौसम बारिश और ओलावृष्टि से 1389 हेक्टेयर में फसलें तबाह हो गईं, खासकर गोरेगांव में। धान और मक्का जैसी रबी फसलें बुरी तरह प्रभावित हैं, जिससे पहले के नुकसान के बाद किसानों की मुश्किलें बढ़ गई हैं। बारिश से नुकसान का अनुमान और बढ़ गया है।

Web Title : Gondia: Unseasonal Rain, Hailstorms Damage Crops Across 1389 Hectares

Web Summary : Unseasonal rain and hailstorms in Gondia damaged crops across 1389 hectares, especially in Goregaon. Rabi crops like paddy and maize are severely affected, adding to farmers' woes after previous losses. Further rain increases damage estimates.