भ्रष्ट शिक्षण व्यवस्थेने घेतला बळी: अरविंद केजरीवाल; मयत सिद्धार्थ हेगडे याच्या कुटुंबियांचे केले सांत्वन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 12:05 IST2026-05-15T12:04:32+5:302026-05-15T12:05:17+5:30
केजरीवाल यांनी मयत विद्यार्थी सिद्धार्थ हेगडे याच्या घरी सां जुझे दे आरियल येथे त्याच्या घरी भेट घेऊन कुटुंबियांचे सांत्वन केले.

भ्रष्ट शिक्षण व्यवस्थेने घेतला बळी: अरविंद केजरीवाल; मयत सिद्धार्थ हेगडे याच्या कुटुंबियांचे केले सांत्वन
लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : सिद्धार्थ हेगडे या १७ वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या ही केवळ एक वैयक्तिक शोकांतिका नसून, ती आपल्या भ्रष्ट शिक्षण व्यवस्थेने घेतलेला बळी आहे. नीट परीक्षेतील सातत्याने होणारे गोंधळ आणि पेपरफुटीमुळे आज देशातील तरुण पिढी नैराश्याच्या आणि 'नर्वस ब्रेकडाउन'च्या उंबरठ्यावर उभी आहेत असे मत दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केले.
गुरुवारी दुपारी केजरीवाल यांनी दुपारी गोवा आम आदमी पक्षाचे संयोजक वाल्मिकी नायक, आमदार क्रूझ सिल्वा, दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री अतिशी यांच्यासोबत मयत विद्यार्थी सिद्धार्थ हेगडे याच्या घरी सां जुझे दे आरियल येथे त्याच्या घरी भेट घेऊन कुटुंबियांचे सांत्वन केले.
देशात परीक्षा रद्द होण्याचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. यामागे केवळ छोटे दलाल नसून, यंत्रणेवर ताबा मिळवून बसलेले 'मोठे लोक' सामील असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे. अटक करण्यात आलेले संशयित स्वतः कॅमेऱ्यासमोर छोट्या लोकांना का पकडता, बड्यांना का नाही? असा प्रश्न विचारत आहेत. ज्यावरून या घोटाळ्याची पाळेमुळे किती खोलवर रुजलेली आहेत, हे स्पष्ट होते असे केजरीवाल यांनी नमूद केले.
जीवन म्हणजे संघर्ष आहे, असे आवाहन करत तरुणांना टोकाचे पाऊल न उचलण्याची विनंती करण्यात येत आहे. जोपर्यंत सर्वोच्च स्थानी बसलेल्या दोषींना कठोर शिक्षा होत नाही, तोपर्यंत लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारातच राहील. आता केवळ चौकशीने काम होणार नाही, तर या भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध रस्त्यावर उतरून लढा देण्याची वेळ आली आहे.
सीबीआयवरही प्रश्नचिन्ह
या संपूर्ण प्रकरणाचे धागेदोरे सत्ताधारी भाजप नेत्यांपर्यंत पोहोचत असल्याचा थेट आरोप करत सदर प्रकरणाची सीबीआय चौकशीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. सीबीआय ही केंद्र सरकारच्या अखत्यारीत असल्याने या प्रकरणावर केवळ 'लिपापोती' केली जाईल आणि काही महिन्यांत दोषी मोकळे होतील, असे केजरीवाल म्हणाले.