काँग्रेस, 'इंडी'विरोधात पदयात्रा; भाजप महिला आघाडी एकवटली, मुख्यमंत्र्यांनीही लावली उपस्थिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 07:53 IST2026-04-22T07:51:42+5:302026-04-22T07:53:31+5:30
पदयात्रेमध्ये सहभागी झालेल्या महिलांनी हातांत फलक घेऊन विरोधी पक्षांच्या धोरणांचा निषेध केला.

काँग्रेस, 'इंडी'विरोधात पदयात्रा; भाजप महिला आघाडी एकवटली, मुख्यमंत्र्यांनीही लावली उपस्थिती
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्यावतीने मंगळवारी काँग्रेस आणि इंडी आघाडीच्या महिलाविरोधी भूमिकेचा निषेध करत 'महिला जन आक्रोश पदयात्रा' काढण्यात आली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत पदयात्रा काढण्यात आली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि इंडी आघाडीच्या महिलाविरोधी धोरणांचा आणि मानसिकतेचा तीव्र निषेध करण्यासाठी राज्यातील नारीशक्ती एकवटल्याचे चित्र पाहायला मिळाले. पदयात्रेमध्ये सहभागी झालेल्या महिलांनी हातांत फलक घेऊन विरोधी पक्षांच्या धोरणांचा निषेध केला.
पदयात्रेच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या 'नारीशक्ती वंदन अधिनियमा'ला विरोध करणाऱ्या आणि महिलांच्या हक्काच्या प्रतिनिधित्वात सातत्याने अडथळे निर्माण करणाऱ्या विरोधी पक्षांच्या भूमिकेचा जोरदार समाचार घेण्यात आला. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले की, राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो महिलांनी अत्यंत जिद्दीने आंदोलनात सहभाग नोंदवला आहे.
काँग्रेसने 'नारीशक्ती'चा विश्वासघात केला : दामू नाईक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना संसदेत आणि विधानसभेत ३३ टक्के आरक्षण देण्यासाठी 'नारीशक्ती वंदन' विधेयक आणले. मात्र, काँग्रेसने अनेक दशके हे आरक्षण अडवून ठेवून देशातील महिला शक्तीचा विश्वासघात केला आहे, अशी टीका भाजपचे प्रदेश अध्यक्ष दामू नाईक यांनी केली.
भारताची नारीशक्ती आता अधिक जागरूक झाली असून ती यापुढे कोणताही विलंब, नकार किंवा विश्वासघात सहन करणार नाही. लोकशाही संस्थांमध्ये महिलांचे प्रतिनिधित्व वाढवण्याला विरोध करणे म्हणजे देशाच्या विकासाला विरोध करण्यासारखेच आहे. काँग्रेस आणि इंडी आघाडीने केवळ घोषणाबाजी करून महिलांची दिशाभूल केली. मात्र आता प्रत्यक्षात कृती करण्याची वेळ आली असताना ते पळवाट काढत आहेत.' - डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री.