संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 06:22 IST2025-12-16T06:22:29+5:302025-12-16T06:22:52+5:30
ऑस्ट्रेलियासारख्या तुलनेने सुरक्षित, शांत आणि बहुसांस्कृतिक देशात, रविवारी ज्यू समुदायाला लक्ष्य करून झालेला दहशतवादी हल्ला अनेक अर्थानी अस्वस्थ करणारा आहे.

संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
लोकशाही मूल्यांवर उभ्या असलेल्या देशांमध्ये दहशतवादाचा शिरकाव नवा नाही; मात्र ऑस्ट्रेलियासारख्या तुलनेने सुरक्षित, शांत आणि बहुसांस्कृतिक देशात, रविवारी ज्यू समुदायाला लक्ष्य करून झालेला दहशतवादी हल्ला अनेक अर्थानी अस्वस्थ करणारा आहे. हा हल्ला जागतिक सुरक्षाव्यवस्थेच्या अपयशावर, धार्मिक उन्मादाच्या आंतरराष्ट्रीय जाळ्यावर आणि तथाकथित महासत्तांच्या ढोंगी धोरणांवर प्रकाश टाकतो. या हल्ल्याची पूर्वसूचना ऑस्ट्रेलियाला दिली होती, असे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी सांगितले आहे; पण दहशतवादी हल्ल्यांची पूर्वसूचना हल्ला थांबवण्यासाठी पुरेशी ठरत नाही, हे यापूर्वीही अनेकदा सिद्ध झाले आहे.
नेतन्याहूंच्या वक्तव्यामुळे एक गोष्ट मात्र अधोरेखित होते आणि ती म्हणजे हा हल्ला अचानक झालेला नसून, नियोजनबद्धरीत्या घडवून आणण्यात आला आणि आंतरराष्ट्रीय संदर्भाशी जोडलेला होता. ज्यू समुदायाला लक्ष्य करण्यात आल्यामुळे, हल्ल्याला इस्रायल-पॅलेस्टाइन संघर्षाची किनार असण्याची दाट शक्यता दिसते; पण हल्लेखोर पॅलेस्टिनी नव्हे, तर पाकिस्तानी होते आणि बापलेक होते! एका पिढीने दुसऱ्या पिढीकडे द्वेषाचा वारसा सोपवणे, ही कोणत्याही समाजासाठी धोक्याची घंटा आहे अनेकांना हल्लेखोरांची धार्मिक ओळखही ठसठशीतपणे दिसेल.
अशा मानसिकतेच्या लोकांचे दात त्यांच्या घशात घालणारा एक पैलूही सदर घटनाक्रमाशी जुळलेला आहे. जीवावर उदार होऊन, हल्लेखोरांपैकी एकाशी निःशस्त्र भिडलेला अहमद अल अहमद हा सिरियन निर्वासित मुस्लिम आहे. अहमदचे धाडस आणि शौर्य हे ठळक सत्य अधोरेखित करते, की दहशतवादाला धर्माचे लेबल लावणे चुकीचे आणि धोकादायक आहे! दहशतवादी मुस्लिम असू शकतो; पण दहशतवादाविरोधात उभा राहणाराही मुस्लिम असू शकतो! अहमद स्वतः युद्ध, हिंसा आणि विस्थापनाचा बळी असतानाही, त्याने मानवतेची बाजू घेतली.
'मुस्लिम विरुद्ध गैरमुस्लिम' असा लगोलग निष्कर्ष काढण्याची सक्य लागलेल्या मंडळींनी, सरधोपट मांडणी वास्तवाशी प्रतारणा करणारी असते, हे अहमदच्या उदाहरणावरून तरी उमजून घ्यावे। दहशतवादाचा इस्लामशी संबंध जोडणे चूक असले तरी, जगभरातील बहुतांश मोठ्चा दहशतवादी हल्ल्यांमध्ये, प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष स्वरूपात पाकिस्तानी सहभाग आढळतो, या वस्तुस्थितीकडे डोळेझाक करता येत नाही. जगभरातील बहुतांश कट्टरपंथी संघटनांचे धागेदोरे पाकिस्तानशी जुळले असल्याचे अनेकदा सिद्ध झाले आहे. तरीदेखील पाकिस्तान सातत्याने, तोच दहशतवादाचा बळी असल्याची आवई उठवत असतो.
त्याहून गंभीर बाब म्हणजे, अमेरिका आणि चीन या दोन महासत्ता पाकिस्तानची सातत्याने पाठराखण करतात. अमेरिका दहशतवादाविरोधात युद्धाचे ढोल बडवते, पण पाकिस्तान आणि दहशतवादी संघटनांमधील संबंधांकडे सोयीस्कर दुर्लक्ष करते. अमेरिकेसाठी पाकिस्तान हे चीनला रोखण्यासाठीचे, मध्य आशियात प्रभाव राखण्यासाठीचे भू-राजकीय साधन आहे. दुसरीकडे पाकिस्तान हा चीनसाठी भारतविरोधी तोल सांभाळणारा देश, अरबी समुद्राचे प्रवेशद्वार आणि मुस्लिम जगतातील विश्वासू सहकारी आहे. त्यामुळे पाकिस्तानमधील दहशतवादी कारखान्यांकडे चीन डोळेझाक करतो. भू-राजकीय अपरिहार्यता नैतिकतेवर मात करते, हेच यातून दिसते.
एकीकडे दहशतवादाविरोधात ठाम भूमिका घेतल्याचा आव आणायचा आणि दुसरीकडे दहशतवाद पोसणाऱ्या देशांना आर्थिक, लष्करी आणि राजनैतिक संरक्षण द्यायचे, ही नीती अखेरीस जगालाच महागात पडते. भारत गेली अनेक दशके हे जगाच्या कानीकपाळी ओरडून सांगत आहे; कारण तो पाकिस्तानप्रायोजित दहशतवादाचा सर्वात मोठा बळी आहे. त्यामुळे भारताने ऑस्ट्रेलियातील हल्ल्याकडे केवळ विदेशातील घटना म्हणून पाहणे, ही गंभीर चूक ठरेल; कारण जे रविवारी ऑस्ट्रेलियात घडले, ते उद्या भारतातही घडू शकते। किंबहुना दिल्लीत काही दिवसांपूर्वीच घडलेही। ऑपरेशन सिंदूरमुळे खवळलेल्या दहशतवादी संघटना गत काही काळापासून भारताला सातत्याने हल्ल्याच्या धमक्या देत आहेतच!
दहशतवादाचा नायनाट केवळ बंदुकीने होऊ शकत नाही. त्यासाठी विचारसरणीच्या पातळीवरच लढा द्यावा लागेल. ऑस्ट्रेलियातील हल्ला केवळ एका देशावर, धर्मावर किंवा समुदायावर झालेला नसून, तो मानवता, सहअस्तित्व आणि जागतिक शांततेवरील हल्ला आहे. हा हिंसाचार, पाकिस्तानातून पोसली जाणारी कट्टरता आणि महासत्तांच्या स्वार्थी भू-राजकारणाचा घातक संगम आहे. जगाने वास्तवाकडे डोळेझाक सुरूच ठेवल्यास, ही मालिका थांबणार नाही. त्यामुळे दहशतवादाविरोधात भूमिका घेताना, आता शब्दांपेक्षा कृतीला महत्त्व देण्याची वेळ आली आहे, अन्यथा निरपराधांचा रक्तपात सुरूच राहीला.