Worth 5 crore gold theft by WhatsApp status followed | व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस फॉलो करून पावणेचार कोटींचे सोने लांबविले
व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस फॉलो करून पावणेचार कोटींचे सोने लांबविले

ठळक मुद्देचार जणांना ४८ तासांत जेरबंद : पुणे ग्रामीण पोलिसांची कारवाई

पुणे :  व्यापाऱ्याला व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस ठेवण्याची चक्क ‘कोटीत’ किंमत मोजावी लागली. जिथे जाईल तिथे व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस अपडेट ठेवण्याचे काम तो करीत असे. चोरट्यांच्या नजरेतून ही गोष्ट सुटली नाही. ज्या गावात व्यापारी सोने खरेदीला गेल्याची माहितीदेखील त्यांच्या स्टेटसवरूनच चोरट्यांना समजली. शेवटी चोरट्यांनी कट करून तब्बल पावणेचार कोटींचे सोने लांबविले; मात्र पुणे ग्रामीण पोलिसांनी कारवाई करून चोरट्यांच्या मुसक्या आवळून त्यांना जेरबंद केले. 
दौंड रेल्वे स्थानकाच्या तिकीट घरासमोर दोन जणांना चाकूचा धाक दाखवून बळजबरीने गाडीत बसवून त्यांच्याकडून सोन्याचे बिस्कीट व रोख रक्कम पळविणाºया चार जणांना पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल ३ कोटी ७० लाख ७१ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही घटना सहा नोव्हेंबर रोजी पहाटे पावणेसहाच्या सुमारास मौजे दौंड गावच्या हद्दीत घडली होती. याप्रकरणी अप्पा श्रीराम कदम (रा. कौठळी, ता. आटपाडी, सांगली) यांनी फिर्याद दिली होती. पुणे ग्रामीण पोलिसांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन या गुन्ह्याच्या तपासाबद्दल माहिती दिली. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार : गणेश दगडू पवार (२७), अभिजित उर्फ बाळू दिलीप चव्हाण (२३, दोघेही रा. महूद, नागणखोरा, जि. सोलापूर), मोहसीन हमजेखान मुलानी (२५), प्रथमेश विजय भांबुरे (२६, दोघेही रा. दिगंची, कटफळगल्ली, जि. सांगली) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली चारचाकी जप्त करण्यात आली असून, त्यातून ९ किलो ५०० ग्रॅम इतक्या वजनाचे २९ बिस्कीट, सोन्याच्या ३ मोठ्या पट्ट्या, ४ मोबाईल फोन, एक एअर गन असा ३ कोटी ७० लाख ७१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.
.....
फिर्यादी यांना व्हॉट्सअ‍ॅपवर स्टेटस ठेवण्याची सवय होती; तसेच ते नेहमी दौंड येथे उतरून सोने घेऊन जात असे. आरोपींनी फिर्यादींचे व्हॉट्सअ‍ॅपचे स्टेटसवरून फिर्यादीवर पाळत ठेवली. फिर्यादी यांनी सोन्याचे बिस्कीट घेऊन जाताना ‘गुडबाय कौठळी’ असे स्टेटस ठेवले होते. ते आरोपींनी वाचल्यानंतर, त्यांना फिर्यादी घर सोडून सोने आणण्याकरिता गेले असल्याची खात्री पटली. त्यांनी तातडीने फिर्यादींना लुटण्याचा कट तयार क रून त्यांच्याकडील सोने लुटले. अपर पोलीस अधीक्षक जयंत मीना, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी यांनी गुन्हा तत्काळ उघडकीस आणून आरोपींना अटक करण्याकरिता स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना आदेश दिले होते. सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांच्यासह पोलीस हवालदार महेश गायकवाड, नीलेश कदम, सचिन गायकवाड, मोरेश्वर इनामदार, राजू पुणेकर, पोलीस नाईक गुरू गायकवाड, सुभाष राऊत यांनी तपासकामात महत्त्वाची भूमिका बजावली.   

Web Title: Worth 5 crore gold theft by WhatsApp status followed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.