West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2026 21:02 IST2026-05-01T21:01:39+5:302026-05-01T21:02:54+5:30
पश्चिम बंगालमध्ये मगराहट पश्चिम आणि डायमंड हार्बर मतदारसंघातील १५ केंद्रांवर २ मे रोजी पुन्हा मतदान होणार आहे.

West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत एक मोठी बातमी समोर येत आहे. निवडणूक आयोगाने राज्यातील १५ मतदान केंद्रांवर पुन्हा मतदान घेण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये मगराहट पश्चिम आणि डायमंड हार्बर या दोन विधानसभा मतदारसंघांतील केंद्रांचा समावेश आहे. २९ एप्रिल रोजी झालेल्या मतदानादरम्यान काही तक्रारी आणि अनियमितता समोर आल्यानंतर आयोगाने हा कठोर पाऊल उचलले आहे.
नेमकी काय आहे घटना?
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचे टप्पे पार पडत असतानाच, डायमंड हार्बर आणि मगराहट पश्चिम विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर घोळ झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. विशेषतः भाजपच्या वतीने तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांच्या मतदारसंघात निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप केल्याचा आरोप करण्यात आला होता. या तक्रारींची दखल घेत निवडणूक आयोगाने विशेष निरीक्षक सुब्रत गुप्ता यांची नियुक्ती केली होती. त्यांच्या अहवालाच्या आधारे आता या १५ केंद्रांवर पुन्हा मतदान घेण्याचा निर्णय झाला आहे.
कधी आणि कुठे होणार मतदान?
निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, मगराहट पश्चिम विधानसभा मतदारसंघातील ११ बूथवर आणि डायमंड हार्बर मतदारसंघातील ४ बूथवर २ मे रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत पुन्हा मतदान प्रक्रिया राबवली जाईल. स्थानिक निवडणूक अधिकारी आणि निरीक्षकांनी दिलेल्या अहवालाची शहानिशा केल्यानंतरच आयोगाने हा आदेश दिल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
West Bengal Elections 2026 | Repolling to be held on 11 booths of Magrahat Paschim Assembly constituency and 4 booths of Diamond Harbour Assembly constituency in South 24 Parganas tomorrow, 2nd May. pic.twitter.com/VbtnepLWvG
— ANI (@ANI) May 1, 2026
ईव्हीएमच्या सुरक्षेवरून राजकारण तापले
दरम्यान, निकालाच्या तोंडावर ईव्हीएम आणि स्ट्रॉन्ग रूमच्या सुरक्षेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भवानीपूर मतदारसंघातील स्ट्रॉन्ग रूममध्ये घोळ होण्याची शक्यता वर्तवली होती. मात्र, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी मनोज अग्रवाल यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. "मतमोजणी केंद्रांवर गडबडीची कोणतीही शक्यता नाही. स्ट्रॉन्ग रूमची २४ तास सीसीटीव्हीद्वारे देखरेख सुरू आहे," असे स्पष्टीकरण अग्रवाल यांनी दिले आहे.
दुसरीकडे, टीएमसी प्रवक्ते कुणाल घोष यांनी सांगितले की, पक्षाचे कार्यकर्ते आणि उमेदवार स्वतः स्ट्रॉन्ग रूमवर लक्ष ठेवून आहेत. कोलकातामध्ये गुरुवारी रात्री ईव्हीएमच्या सुरक्षेवरून तृणमूल कार्यकर्त्यांनी गोंधळही घातला होता.