महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2026 18:54 IST2026-05-01T18:52:52+5:302026-05-01T18:54:59+5:30

Raj Thackeray News: माझी मराठी माणसाला हात जोडून विनंती आहे की संयुक्त महाराष्ट्रचा लढा विसरू नका, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

raj thackeray post on maharashtra day 2026 regarding hutatma smarak mumbai criticize the govt and appeal to marathi people | महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका

महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका

Raj Thackeray News: संपूर्ण राज्यात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र होण्यासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्मांचे स्मरण करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांना हुतात्मा चौक स्मारक, मुंबई येथे पुष्पचक्र अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. यात हुतात्मा स्मारकाचा संदर्भ देत सरकारवर टीका केली आहे. 

सर्वप्रथम महाराष्ट्र दिनाच्या आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा. दरवर्षीप्रमाणे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मी मुंबईतल्या हुतात्मा स्मारकाला जाऊन, या लढ्यातील हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. हा दिवस या  हुतात्म्यांच्या स्मरणाचा जसा आहे, तसा तो मुंबईसारखं शहर जे घडवण्यात मराठी माणसांनी स्वतःचा घाम, रक्त ओतलं आणि हे शहर आपल्याला मिळवण्यासाठी काय संघर्ष करावा लागला याचं स्मरण करण्याचा दिवस आहे, असे राज ठाकरे यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

महाराष्ट्र दिनाबद्दलची नक्की अनास्था कशातून आली आहे? 

पण मला गेली अनेक वर्ष एक गोष्ट प्रकर्षाने जाणवत आहे ती म्हणजे, सरकार जसे औपचारिकता म्हणून अनेक दिवस साजरे करतं तसा हा अजून एक सरकारी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो आहे. या स्मारकाला नीट सजावट नव्हती, सगळा सरकारी अनुत्साह जाणवत होता. सरकारला आणि त्यांच्या विभागांना आपल्या महाराष्ट्र दिनाबद्दलची नक्की अनास्था कशातून आली आहे?, असा सवाल राज ठाकरे यांनी केला. तसेच वरती बसलेले वरिष्ठ ज्या राज्यातून येतात त्या राज्याच्या मनात मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला याची सल आहे. त्यामुळे इथे गाजावाजा करत आनंद व्यक्त केला आणि वरिष्ठांची खप्पामर्जी ओढवली तर काय होईल असा काही भाव सरकारच्या मनात आहे का? हाच दिवस जैन समूहाचा किंवा तत्सम समूहाचा असता तर सरकारने सर्वत्र गालिचे अंथरले असते, रोषणाई केली असती, तिथे कधीही हात आखडता घेतला नसता. पण महाराष्ट्र राज्यासाठी, मुंबईसाठी, इथल्या माणसांसाठी जो आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस आहे, तिथे मात्र अगदी सुतकी पद्धतीने हा दिवस साजरा केला जातोय, अशी खंत राज ठाकरे यांनी बोलून दाखवली.

सरकारची इच्छा मराठी माणसाला स्मारकाचा विसर पडावा अशी आहे काय?

मला तर असं पण वाटून गेलं की सरकारची इच्छा लवकरात लवकर मराठी माणसाला या स्मारकाचा विसर पडावा अशी आहे की काय? बरं, सरकारकडून अपेक्षा आहेत पण त्या अपेक्षांची पूर्तता होणार नाही याची जवळपास खात्री पटली आहे. पण मराठी माणसाला काय झालं आहे? मुंबईतील हुतात्मा स्मारक हे फक्त मुंबईतील नाही तर राज्यातील तमाम मराठी जनांसाठी अभिमानाचे प्रतीक असायला हवे. खरंतर या स्मारकाला एखाद्या तीर्थक्षेत्रासारखी गर्दी व्हायला हवी. इथे मराठी माणसांच्या झुंडीच्या झुंडी फक्त मुंबई आणि आसपासच्या परिसरातून नाही तर राज्यभरातून धडकायला हव्यात. मिरवणुका निघायला हव्या. पण सरकार इतकीच अनास्था मराठी माणसाच्या मनात उत्पन्न का झाली आहे? मुंबई हा आपल्या अस्मितेचा, स्वाभिमानाचा कणा आहे. हे शहर आपण मराठी माणसांनी घडवलं, याला आकार आपण दिला आणि आपण ते लढून मिळवलं. पण हे सगळं आपण विसरलो आहोत, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, माझी मराठी माणसाला हात जोडून विनंती आहे की संयुक्त महाराष्ट्रचा लढा विसरू नका, आपलं हुतात्मा स्मारक विसरू नका. या हुतात्मा स्मारकाच्या आसपासची जी गगनचुंबी मुंबई दिसते ती हे शहर या राज्याचा भाग होतं म्हणून झाली आहे हे विसरू नका आणि याची जाणीव इतरांना देखील जास्तीत जास्त करून द्या. आणि याचा अभिमान बाळगा. मुंबई आणि आसपासच्या शहरांमधल्या मराठी माणसांनी पुढच्या वर्षी आवर्जून १ मे ला इथे येऊन हुतात्म्यांना वंदन करा आणि राज्यातून मुंबईत येणाऱ्या मराठी माणसांनी देखील जरूर भेट द्या. हे झालं तर सरकारला पण दखल घ्यावी लागेल. मी गेली अनेक वर्ष जे सातत्याने सांगतोय तेच पुन्हा सांगतो, जर आपण आपल्या भाषेचा, संस्कृतीचा, आणि प्रांताचा जाज्वल्य अभिमान बाळगला तर आणि तरच बाहेरचे आपल्या भाषेचा आणि प्रांताचा सन्मान करतील, अशी अपेक्षा राज ठाकरे यांनी व्यक्त केली.

Web Title : राज ठाकरे का महाराष्ट्र दिवस पोस्ट: शहीद स्मारक, अपील, सरकार की आलोचना

Web Summary : राज ठाकरे ने महाराष्ट्र दिवस पर शहीद स्मारक के प्रति सरकार की उदासीनता की आलोचना की। उन्होंने मराठी लोगों से मुंबई के लिए किए गए बलिदानों को याद रखने और स्मारक पर जाने का आग्रह किया, इसे गर्व का विषय बताया।

Web Title : Raj Thackeray's Maharashtra Day Post: Martyrs' Memorial, Appeal, Government Criticized

Web Summary : Raj Thackeray criticized the government's apathy towards the Martyrs' Memorial on Maharashtra Day. He urged Marathi people to remember the sacrifices made for Mumbai and to visit the memorial, holding it as a matter of pride.