समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2026 22:14 IST2026-05-01T22:14:29+5:302026-05-01T22:14:52+5:30
US-Iran War Update: युद्धविरामामुळे संघर्ष थांबला असला तरी इराणची आर्थिक कोंडी करण्यासाठी होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या तोंडासह आजूबाजूच्या भागात अमेरिकन नौदलाने तगडी नाकेबंदी केली आहे.

समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी
अमेरिका आणि इस्राइलने इराणविरोधात सुरू केलेल्या सैनिकी कारवाईला आता दोन महिन्यांहून अधिक काळ लोटत आला आहे. गेल्या काही दिवसांपासून युद्धविरामामुळे दोन्ही बाजूंनी संघर्षाला अर्धविराम मिळाला असला तरी आखातामधील तणावपूर्ण परिस्थिती कायम आहे. त्यातच युद्धविरामामुळे संघर्ष थांबला असला तरी इराणची आर्थिक कोंडी करण्यासाठी होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या तोंडासह आजूबाजूच्या भागात अमेरिकन नौदलाने तगडी नाकेबंदी केली आहे. या नाकेबंदीमुळे इराणकडून होणाऱ्या खनिज तेलाच्या निर्यातीला मोठा धक्का बसला आहे. एवढचं नाही तर अमेरिकेने केलेल्या या कोंडीमुळे इराणकडून तेलाची मोठ्या प्रमाणात तेलाची आयात करणाऱ्या चीनचीही कोंडी झाली आहे.
अमेरिकेने केलेल्या नाकेबंदीमुळे निर्यात ठप्प झाल्याने इराणकडील खनिज तेलाच्या साठवणुकीची जागा संपत चालली आहे. नाकेबंदीदरम्यान अमेरिकन नौदल इराणी टँकरांना होर्मुझची सामुद्रधुनी पार करून इतर देशांमध्ये जाऊ देत नसल्याने तेल टँकरांमध्येही खनिज तेल साठून आहे. मात्र काही तेलवाहू जहाजे आपली ट्रॅकिंग सिस्टिम बंद करून मार्गाक्रमण करत आहेत. त्यामुळे इराण चीनला किती तेलपुरवठा करत आहे, याची अचूक माहिती मिळणे कठीण झाले आहे.
चीन इराणकडून दररोज १३ ते १४ लाख बॅरल खनिज तेलाची खरेदी करतो. इराण आपल्या एकूण तेलाच्या निर्यातीपैकी तब्बल ८० ते ९० टक्के निर्यात ही चीनला करतो. मात्र अमेरिकेने केलेल्या नाकेबंदीमुळे हे तेल चीनपर्यंत पोहोचण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे चीनच्याही अडचणीत वाढ झाली आहे. खनिज तेलाच्या वाहतुकीचं विश्लेषण करणारी संस्था असलेल्या वोर्टेक्साने दिलेल्या माहितीनुसार १३ ते २५ एप्रिलदरम्यान ओमानच्या आखातामधून इराणकडील खनिज तेलाची वाहतूक करणारे केवळ काही टँकरच बाहेर पडू शकले आहेत. हे प्रमाण मार्चमध्ये झालेल्या वाहतुकीच्या तुलनेत ८० टक्क्यांनी कमी आहे. मार्चमध्ये इराणने २.३४ कोटी बॅरल तेलाची निर्यात केली होती.
दरम्यान, इराणच्या बंदरांमधून निघालेल्या अनेक जहाजांना अमेरिकन नौदलाने रोखले आहे. त्याशिवाय आशियाई सागरी क्षेत्रामध्येही कंटेनर वाहून नेणारी जहाजे आणि इराणी टँकर्सना अमेरिकेकडून लक्ष्य केले जात आहे.