सूट-बूट घालून आला, पाहुण्यांमध्ये मिसळला अन् ५ लाख घेऊन पळाला; Video पाहून बसेल धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 13:05 IST2026-04-20T13:05:05+5:302026-04-20T13:05:40+5:30
नोएडाच्या सेक्टर ५१ मधील 'डायमंड क्राउन बँक्वेट हॉल'मध्ये साखरपुड्याच्या कार्यक्रमादरम्यान धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

सूट-बूट घालून आला, पाहुण्यांमध्ये मिसळला अन् ५ लाख घेऊन पळाला; Video पाहून बसेल धक्का
नोएडामध्ये जर तुम्ही लग्न किंवा साखरपुड्यासारखे कार्यक्रम आयोजित करत असाल आणि तिथे सूट-बूट घालून लोक येत असतील, तर येणारा प्रत्येक व्यक्ती पाहुणाच असेल असं नाही. असंही होऊ शकतं की, वऱ्हाडी बनून एखादा चोर तुमच्या शुभकार्यात सामील झाला असेल, जो तुमच्या आनंदावर विरजण घालू शकतो. नोएडाच्या सेक्टर ५१ मधील 'डायमंड क्राउन बँक्वेट हॉल'मध्ये साखरपुड्याच्या कार्यक्रमादरम्यान असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
एका चोराने ५ लाख रुपये असलेली बॅग लंपास केली. ही घटना सेक्टर ४९ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी बँक्वेट हॉलमध्ये साखरपुड्याचा कार्यक्रम सुरू होता आणि दोन्ही बाजूंकडील मंडळी आनंदात होती. याच दरम्यान सूट-बूट घातलेला एक तरुण, जो व्यवस्थित तयार होऊन आला होता, त्याने समारंभात प्रवेश केला.
Suit Boot thief easily lifting a bag and fleeing.
\\\— Oxomiya Jiyori 🇮🇳 (@SouleFacts) April 20, 2026
In Noida, a suit-boot clad thief walked into a banquet hall, picked up a bag full of cash and jewelry, and walked out like he owned the place. pic.twitter.com/CJRzDyVerf
५ लाख केले लंपास
चोराने आधी आरामात तिथल्या वातावरणाचा अंदाज घेतला, इकडे-तिकडे फिरून लोकांमध्ये मिसळून गेला जेणेकरून कोणालाही संशय येऊ नये. त्यानंतर त्या तरुणाची नजर एका अशा बॅगवर पडली ज्यात रोख रक्कम ठेवली होती. संधी मिळताच तो ती बॅग घेऊन पसार झाला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याने आधी नीट जेवण केलं आणि त्यानंतर ५ लाख रुपयांची बॅग उचलून तिथून पळ काढला.
घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
ही संपूर्ण घटना बँक्वेट हॉलमध्ये लावलेल्या सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाली आहे. फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, आरोपी आधी काही वेळ सामान्यपणे फिरतो आणि नंतर संधी साधून बॅग आपल्या सूटच्या मागे लपवून बाहेर पडतो. काही वेळाने जेव्हा कुटुंबाला बॅग चोरीला गेल्याचं समजलं, तेव्हा एकच खळबळ उडाली. खूप शोध घेऊनही बॅग सापडली नाही, त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासले असता चोरीचा उलगडा झाला. पीडित कुटुंबाने सेक्टर ४९ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. पोलीस आता सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत.