"लग्न लावून दिलंत तर..."; मैत्रिणीच्या प्रेमात वेड्या झालेल्या तरुणीची धमकी, थेट नवरीलाच पळवलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 12:59 IST2026-01-03T12:58:18+5:302026-01-03T12:59:39+5:30
दोन महाविद्यालयीन तरुणी लग्न करण्याच्या उद्देशाने घरातून पळून गेल्या आहेत.

फोटो - जागरण
पंजाबच्या तरन तारन जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि विचित्र घटना समोर आली आहे. येथे दोन महाविद्यालयीन तरुणी लग्न करण्याच्या उद्देशाने घरातून पळून गेल्या आहेत. या दोघीही दीर्घकाळापासून एकमेकींना ओळखत होत्या. या घटनेमुळे दोन्ही कुटुंबांना मोठा धक्का बसला आहे. याप्रकरणी एका तरुणीच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
लग्नापूर्वीच नववधू बेपत्ता
तरन तारन जिल्ह्यातील 'मोहल्ला मुरादपुरा' येथे ही घटना घडली आहे. तक्रारदार महिलेने पोलिसांना सांगितलं की, तिच्या मुलीचं १४ जानेवारी रोजी लग्न एका स्थानिक तरुणाशी होणार होतं. घरात लग्नाची लगबग सुरू होती, पण लग्नापूर्वीच तिची मैत्रीण तिला फूस लावून पळवून घेऊन गेली. या घटनेची माहिती मिळताच मुलाकडच्यांनी हे लग्न मोडलं आहे.
मैत्रीचे प्रेमात रूपांतर आणि धमकी
तरुणीच्या आईने सांगितले की, दोघींनी इयत्ता ९ वी ते १२ वी पर्यंत एकत्र शिक्षण घेतलं होतं. शिक्षणादरम्यान त्यांची मैत्री खूप घट्ट झाली होती. संबंधित मैत्रिणीने 'बॉय कट' केस ठेवले होते. ती मुलगी आमच्याच परिसरात राहत असल्याने सुरुवातीला कोणालाही संशय आला नाही. जेव्हा मुलीचे लग्न ठरलं, तेव्हा ती मैत्रीण संतापली. तिने मुलीच्या भावालाही अनेकदा धमकावलं होतं की, "जर मुलीचं लग्न दुसरीकडे लावून दिले, तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील."
पोलीस तपास सुरू
अखेर या धमक्यांनंतर ती मुलगी नववधूला घेऊन पसार झाली. कुटुंबीयांनी नातेवाईकांकडे शोधाशोध केली, मात्र काहीही सुगावा लागला नाही. सिटी पोलीस ठाण्याचे एसएचओ अमरीक सिंह यांनी सांगितलं की, "या प्रकरणाचा गांभीर्याने तपास सुरू आहे. दोन्ही तरुणींचं लोकेशन शोधण्याचे प्रयत्न केले जात आहेत. कायद्याच्या चौकटीत राहून सर्व पैलूंची तपासणी केली जाईल आणि त्या सापडल्यानंतर त्यांचे जबाब नोंदवले जातील."