नाशिक - शहरातील TCS BPO कंपनीतील कथित अत्याचार, लैंगिक छळ आणि धर्मांतर प्रकरणात आता पीडित महिलेने तिच्यासोबत घडलेला थरारक प्रसंग सांगितला आहे. या जबाबात तिने मैत्री, नोकरीचं आमिष, लग्नाचं आश्वासन, बळजबरीने संबंध बनवणे, धर्म बदलण्यासाठी दबाव आणि खासगी फोटो व्हायरल करून ब्लॅकमेल करण्यासारखे गंभीर आरोप केले आहे. २०२२ ते २०२६ या काळात तिच्यासोबत घडलेल्या घटना तिने एका मुलाखतीत शेअर केल्या. त्यातून या प्रकरणाचे गांभीर्य किती आहे याचा अंदाज येतो.
पीडितेच्या म्हणण्यानुसार, जानेवारी २०२२ मध्ये तिची ओळख दानिश शेखची झाली होती. या दोघांनी एकाच कॉलेजमधून शिक्षण घेतले होते. त्यामुळे दोघांमध्ये लगेच मैत्री झाली. दानिश कायम कामाच्या बहाण्याने तिला भेटायचा. हळूहळू या दोघांमधील बोलणे वाढले. त्याच काळात दानिशने स्वत:ला एका कंपनीत इंजिनिअर असल्याचे सांगत पीडितेला नोकरी देण्याचा भरवसा दिला. त्यातूनच पीडितेचा त्याच्यावर विश्वास बसला. दोघांमधील जवळीक आणखी वाढली. जुलै २०२२ मध्ये दानिशने तिला भेटायला गेले असताना अचानक शारीरिक संबंधाची मागणी केली. त्याने बळजबरीने तिला जवळ ओढले आणि किस केले. जेव्हा पीडितेने त्याला विरोध केला तेव्हा दानिशने लग्नाचा प्रस्ताव दिला. त्याला तिच्यासोबत लग्न करायचे आहे असं त्याने म्हटले. त्यावर पीडिता गोंधळात पडली. तिने विचार करून सांगते असं उत्तर दिले. इंडिया टुडेला दिलेल्या विशेष मुलाखतीत पीडितेने ही घटना सांगितली.
तसेच दानिश सातत्याने पीडितेला भेटत होता, तिला विश्वास देत होता. शिक्षण पूर्ण झाल्यावर पीडिताने दानिशच्या सल्ल्यानुसार एका कंपनीत मुलाखत दिली. तिची निवड झाली. दानिश त्याच कंपनीत काम करत होता. त्यामुळे दोघांचे भेटणे वाढले, संवाद वाढत गेला. याच काळात दानिशचा मित्र तोसिफ अख्तर, निदा खान हेदेखील परिचयाचे बनले. हे सगळे कायम बाहेर फिरण्याच्या निमित्ताने वेळ घालवत होते. त्यांच्यात धर्मावरूनही चर्चा झाली. दानिश, तोसिफ कायम हिंदू आणि मुस्लीम धर्मातील फरक यावर बोलायचे. मुस्लीम धर्म कसा श्रेष्ठ आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करत होते. हिंदू प्रथा परंपरेवर ते प्रश्न उपस्थित करायचे. हळूहळू त्यांच्याकडून पीडितेवर धर्म बदलण्यासाठी मानसिक दबाव वाढला असं पीडितेने सांगितले.
दरम्यान, ऑगस्ट २०२४ ला दानिशने बाइकवर फिरवण्याच्या बहाण्याने पीडितेला एका हॉटेलला नेले. तिथे बळजबरी तिच्यासोबत शारीरिक संबंध बनवले. ही घटना दानिशच्या मित्रालाही माहिती पडली. त्यानंतर तोसिफने त्याचा फायदा घेत पीडितेला ब्लॅकमेल करणे सुरू केले. तोसिफने तिच्याकडे शारीरिक सुखाची मागणी केली मात्र पीडितेने त्याला नाकारले. त्यानंतर तोसिफने पीडितेच्या कुटुंबाला माहिती देण्याची धमकी दिली. तिने त्याला समजवण्याचा प्रयत्न केला परंतु त्याने ऐकले नाही. ऑफिसमध्ये तोसिफ अश्लील चाळे करायचा. कधी कमरेला तर कधी मागील बाजूस पकडायचा. दानिश आणि तोसिफ मिळून पीडितेवर धर्म बदलण्यासाठी दबाव आणत होते. जर त्यांचे ऐकले नाही तर खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यामुळे पीडितेवर दबाव वाढला.
२०२६ मध्ये प्रकरण चर्चेत
फेब्रुवारी २०२६ मध्ये जेव्हा एका महिलेने पीडितेला मेसेज केला तेव्हा यात वळण लागले. या चर्चेत दानिश शेखचं लग्न झाले असून त्याला २ मुले असल्याचे पुढे आले. हे कळताच पीडितेला धक्का बसला. दानिशने स्वत:ला अविवाहित असल्याचे सांगितले होते. जेव्हा पीडितेने त्याला जाब विचारला तेव्हा त्याने हे खोटे असल्याचा दावा केला. जुलै २०२२ ते फेब्रुवारी २०२६ या काळात पीडितेची फसवणूक करण्यात आली. दानिशने वारंवार तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तोसिफनेही तिच्यावर जबरदस्ती केली. या पीडितेने तिला नोकरी, लग्न आणि धर्माच्या नावावर सुनियोजितपणे फसवल्याचा आरोप केला. त्यामुळे आता या प्रकरणाला नवीन वळण लागले आहे.