अफगाणिस्तानात नैसर्गिक संकटांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाहीये. बुधवारी अफगाणिस्तानची राजधानी काबुलसह अनेक भाग भूकंपाच्या धक्क्यांनी पुन्हा एकदा हादरले. गेल्या तीन दिवसांत भूकंपाचा धक्का बसण्याची ही दुसरी वेळ असून, यामुळे नागरिकांमध्ये मोठी घबराट पसरली आहे.
भूकंपाची तीव्रता आणि केंद्र
नॅशनल सेंटर फॉर सीस्मोलॉजीने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी आलेल्या या भूकंपाची तीव्रता ४.६ रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली आहे. हा भूकंप जमिनीच्या १४० किलोमीटर खोलवर झाला होता. विशेष म्हणजे, याआधी १२ एप्रिल रोजी देखील ४.६ तीव्रतेचाच भूकंप झाला होता, ज्याचे केंद्र १५० किलोमीटर खोलवर होते. वारंवार होणाऱ्या या कंपनांमुळे इमारतींना तडे जाण्याची भीती व्यक्त होत आहे.
नैसर्गिक आपत्तींचा मोठा फटका
टोलो न्यूजच्या अहवालानुसार, अफगाणिस्तानच्या २५ प्रांतांमध्ये सध्या नैसर्गिक आपत्तींनी थैमान घातले आहे. केवळ भूकंपच नव्हे, तर आलेल्या महापुरामुळे आतापर्यंत ३५ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर ५२ हून अधिक लोक जखमी झाले आहेत. अफगाणिस्तानातील हिंदूकुश परिसर हा भूकंपाच्या दृष्टीने अत्यंत सक्रिय केंद्र मानला जातो, त्यामुळे येथे सतत जमिनीची हालचाल जाणवत असते.
भारताचा मदतीचा हात
संकटाच्या काळात अफगाणिस्तानला नेहमीच मदत करणाऱ्या भारताने याही वेळी माणुसकीचे दर्शन घडवले आहे. ६ एप्रिल रोजीच भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने अफगाणिस्तानला मदत पाठवली आहे. यामध्ये किचन सेट, हायजीन किट, ताडपत्री, स्लीपिंग बॅग आणि इतर अत्यावश्यक वस्तूंचा समावेश आहे. भारताने स्पष्ट केले आहे की, या कठीण काळात भारत अफगाणिस्तानच्या जनतेसोबत खंबीरपणे उभा आहे.
अफगाणिस्तानमध्येच भूकंप का येतात?
अफगाणिस्तान हे भारतीय आणि युरेशियन टेक्टोनिक प्लेट्सच्या सीमेवर वसलेले आहे. या प्लेट्समधील सततच्या संघर्षामुळे येथे भूकंपाचे धक्के जाणवतात. याशिवाय हेरात प्रांतातून एक मोठी फॉल्ट लाईन जाते, ज्यामुळे हा परिसर नैसर्गिक आपत्तींसाठी अतिशय संवेदनशील बनला आहे.
Web Summary : Afghanistan is facing repeated earthquakes and floods, causing casualties and widespread panic. A 4.6 magnitude earthquake struck Kabul. India has extended humanitarian aid, providing essential supplies to the affected population amidst this crisis.
Web Summary : अफगानिस्तान में बार-बार भूकंप और बाढ़ से तबाही मची है, जिससे जानमाल का नुकसान हुआ है। काबुल में 4.6 तीव्रता का भूकंप आया। भारत ने मानवीय सहायता भेजकर प्रभावित लोगों को जरूरी चीजें मुहैया कराई हैं।