मित्राची कार मागून घेतली अन् प्रोफेसर प्रेयसीला संपवलं; पण एका नोटिफिकेशनमुळे झाला हत्येचा उलगडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 15:35 IST2026-05-05T15:22:21+5:302026-05-05T15:35:45+5:30

बंगळुरुमध्ये एका महिला प्रोफेसरचा आणि लिपिकाचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे.

Secret Affair Ends in Tragedy Man Kills Professor in Borrowed Car Before death | मित्राची कार मागून घेतली अन् प्रोफेसर प्रेयसीला संपवलं; पण एका नोटिफिकेशनमुळे झाला हत्येचा उलगडा

मित्राची कार मागून घेतली अन् प्रोफेसर प्रेयसीला संपवलं; पण एका नोटिफिकेशनमुळे झाला हत्येचा उलगडा

Bengaluru Crime: बंगळुरूमध्ये एका विवाहित प्रोफेसर महिलेचे आणि तिच्या घटस्फोटित प्रियकराचे प्रेमसंबंध अशा भीषण वळणावर संपतील, याची कोणी कल्पनाही केली नव्हती. बंगळुरूमध्ये घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण कर्नाटक हादरले आहे. एका दिवसाच्या अंतराने या दोघांचेही मृतदेह पोलिसांना सापडले. महिलेचा मृतदेह एका जळालेल्या कारमध्ये कोळसा झालेल्या अवस्थेत, तर पुरुषाचा मृतदेह रेल्वे रुळावर छिन्नविछिन्न अवस्थेत आढळला.

नंदी हिल्सची सहल ठरली अखेरची

देवनहल्ली तहसील कार्यालयातील लिपीक सी. रामंजिनाप्पा (४५) आणि एका खासगी महाविद्यालयातील कन्नड विषयाच्या प्रोफेसर सरोजा जे. (४०) यांचे गेल्या काही काळापासून प्रेमसंबंध सुरू होते. गेल्या शनिवारी रामंजिनाप्पाने आपल्या मित्राकडून खोटे कारण सांगून त्याची कार मागून घेतली. सकाळी ९:३० च्या सुमारास त्याने सरोजा यांना बस स्टॉपवरून पिकअप केले. त्यानंतर दोघांनी नंदी हिल्स आणि आसपासच्या परिसरात फिरून वेळ घालवला.

कारमध्ये झाला वाद आणि...

दुपारी उशिरा हे जोडपे दोड्डाबल्लापूरच्या हद्दीतील जिंकेबच्चाहल्ली या निर्जन भागात पोहोचले. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, तिथे कारच्या आत दोघांमध्ये भीषण वाद झाला. रागाच्या भरात रामंजिनाप्पाने हातोड्याने सरोजा यांच्या डोक्यावर वार केला. त्या बेशुद्ध पडल्यानंतर त्याने त्यांना कारच्या मागील सीटवर टाकले आणि कारवर पेट्रोल ओतून ती पेटवून दिली.

स्वतःच आगीच्या विळख्यात सापडला

कार पेटवत असताना रामंजिनाप्पाच्या स्वतःच्या कपड्यांनीही पेट घेतला, ज्यामध्ये तो भाजला गेला. कार पेटवून दिल्यानंतर तो घटनास्थळावरून पळून गेला.

कारमधील आधुनिक फिचरने गेम फिरवला

या गुन्ह्याचा उलगडा होण्यासाठी कारमधील आधुनिक तंत्रज्ञान कारणीभूत ठरले. ज्या मित्राची कार रामंजिनाप्पाने नेली होती, त्या कारमध्ये ऑटो कोलिजन नोटिफिकेशन होती. कार पेटताच मालक सुरेश कुमार यांच्या मोबाईलवर अलर्ट आला. त्यांनी रामंजिनाप्पाला फोन केला, पण त्याचा फोन बंद होता. अखेर पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी चेसिस नंबरवरून मालकाचा पत्ता शोधला आणि सरोजा यांचा मृतदेह ओळखण्यात मदत झाली.

प्रियकराचाही रेल्वे रुळावर करुण अंत

पोलीस रामंजिनाप्पाचा शोध घेत असतानाच, रविवारी सकाळी बिदाडीजवळ रेल्वे रुळावर एका व्यक्तीचा छिन्नविछिन्न मृतदेह सापडल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी मिळाली. मृतदेहाजवळ सापडलेल्या आधार कार्डवरून तो मृतदेह रामंजिनाप्पाचाच असल्याचे स्पष्ट झाले. त्याने आत्महत्येसाठी रेल्वेखाली उडी घेतली असावी, असा पोलिसांना संशय आहे.

दोन कुटुंबे उद्ध्वस्त

सरोजा यांचे पती जयशंकर यांनी याप्रकरणी रामंजिनाप्पा विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांना जळालेल्या कारमध्ये सोन्याचे दागिने सापडले होते, ज्यावरून जयशंकर यांनी आपल्या पत्नीची ओळख पटवली. एका लपूनछपून सुरू असलेल्या नात्याचा असा शेवट झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title : प्रोफेसर की प्रेमी द्वारा हत्या; कार अधिसूचना से मामला खुला।

Web Summary : बेंगलुरु में, एक प्रोफेसर की उसके प्रेमी ने हत्या कर दी, जिसने बाद में आत्महत्या कर ली। उसने एक कार उधार ली, उसकी हत्या की, और वाहन को जला दिया। कार की टक्कर अधिसूचना प्रणाली ने मालिक को सतर्क कर दिया, जिससे अपराध का पर्दाफाश हो गया। एक गुप्त प्रेम संबंध दुखद अंत में समाप्त हो गया।

Web Title : Professor killed by lover; car's notification cracked the case.

Web Summary : In Bengaluru, a professor was murdered by her lover, who then died by suicide. He borrowed a car, killed her, and burned the vehicle. The car's collision notification system alerted the owner, leading to the crime's unraveling. A hidden affair ended tragically.