हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 16:34 IST2026-04-17T16:34:15+5:302026-04-17T16:34:43+5:30
एका मसाज पार्लरमध्ये काम करणाऱ्या तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाला. प्रियकर मृतदेह दफन करायला गेला असताना पतीने तिथे पोहोचल्याने खळबळ उडाली..

हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
उत्तर प्रदेशातील झांशी शहरात एका तरुणीच्या मृत्यूनंतर कब्रस्तानात जो प्रकार घडला, त्याने संपूर्ण पोलीस प्रशासन हादरून गेले आहे. एका मसाज पार्लरमध्ये काम करणाऱ्या मणीपूरच्या तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाला. तिचा मृतदेह दफन करण्यासाठी प्रियकर कब्रस्तानात पोहोचला खरा, पण त्याचवेळी दिल्लीहून पतीही तिथे धडकला आणि एका मोठ्या रहस्याचा उलगडा झाला. ओळख लपवून मृतदेह दफन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आता समोर येत आहे.
भाऊ-बहीण सांगून मृतदेह आणला
नवाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जीवन शाह कब्रस्तानात एक तरुण आणि तरुणी लोडिंग गाडीतून एका महिलेचा मृतदेह घेऊन आले. त्यांनी आपण मृत तरुणीचे भाऊ-बहीण असल्याचे सांगत दफनविधीची परवानगी मागितली. मात्र, संशय आल्याने कब्रस्तान कमिटीने आधार कार्ड मागितले. तेव्हा धक्कादायक बाब समोर आली की, मृत तरुणी ख्रिश्चन धर्मीय होती आणि मृतदेह आणणारे दोघेही मुस्लिम होते.
पतीच्या एन्ट्रीने फुटलं भांडं
मृत तरुणीचे नाव सिम्मी उर्फ टेरेसा असून ती मूळची मणीपूरची होती. तिचा पती दिल्लीत नोकरी करतो. पत्नीच्या मृत्यूची बातमी मिळताच तो नातेवाईकांसह झांशीत पोहोचला. पतीने असा आरोप केला आहे की, सिम्मीचा मृत्यू संशयास्पद असून तिची ओळख पुसून तिला घाईघाईत दफन करण्याचा प्रयत्न केला जात होता. "जर वेळीच हा प्रकार उघड झाला नसता, तर तपास न होताच तिला दफन केले गेले असते," असा संताप नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.
बॉयफ्रेंडचा दावा अन् पोलिसांचा तपास
दुसरीकडे, सिम्मीच्या तथाकथित प्रियकराने सांगितले की, त्यांची ओळख ४-५ महिन्यांपूर्वी एका मसाज पार्लरमध्ये झाली होती. सिम्मी आजारी होती आणि उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. त्याने दफन करण्याचा आरोप फेटाळून लावला असून आपण पोस्टमार्टमसाठी जात होतो असा दावा केला आहे. मात्र, कब्रस्तानच्या चौकीदाराने दिलेल्या जबाबानुसार, हे लोक आधी कानपूर चुंगी कब्रस्तानातही गेले होते, जिथून त्यांना हाकलून देण्यात आले होते.
पोलीस काय म्हणतात?
या प्रकरणातील वाढता तणाव पाहता नवाबाद पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. सिम्मीची मैत्रीण आणि प्रियकर यांची चौकशी सुरू आहे. ही हत्या आहे की नैसर्गिक मृत्यू? तसेच ओळख लपवून दफनविधी करण्याचा उद्देश काय होता? या प्रश्नांची उत्तरे आता पोस्टमार्टम रिपोर्टनंतरच स्पष्ट होतील.