UP Crime: उत्तर प्रदेशातील बिजनौरमध्ये एक थरारक घटना समोर आली आहे. शारीरिक आणि लैंगिक छळ, ब्लॅकमेलिंग आणि पोटच्या मुलीवर असलेली वाईट नजर याला कंटाळून एका महिलेने आपल्या लिव्ह-इन पार्टनरची गोळ्या झाडून हत्या केली. अनुज कुमार असे मृताचे नाव असून, पोलिसांनी याप्रकरणी त्याची पार्टनर शोभा राणी हिला अटक केली.
जंगलात सापडला मृतदेह
२९ एप्रिलच्या सकाळी जुलापूर गावाजवळील जंगलात अनुज कुमारचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळून आला. त्याच्या शरीरावर गोळ्या लागल्याच्या खुणा होत्या. अनुजच्या कुटुंबीयांनी हत्येची तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपास चक्रे फिरवली. तपासादरम्यान पोलिसांचा संशय अनुजसोबत लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या शोभा राणीवर गेला. पोलिसांनी जेव्हा तिची कसून चौकशी केली, तेव्हा तिने गुन्ह्याची कबुली देत सगळ्या प्रकाराची माहिती दिली.
ब्लॅकमेलिंग आणि अत्याचार
शोभाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, २०११ मध्ये तिचे लग्न झाले होते आणि तिला १० वर्षांची मुलगी आहे. पतीपासून वेगळे झाल्यानंतर २०२४ मध्ये तिची ओळख अनुजशी झाली आणि ते एकत्र राहू लागले. मात्र, काही दिवसातच अनुजने आपले खरे रूप दाखवण्यास सुरुवात केली. अनुजने शोभाचे काही आक्षेपार्ह व्हिडिओ रेकॉर्ड केले होते आणि ते व्हायरल करण्याची धमकी देऊन तो तिच्यावर वारंवार अत्याचार करत होता. शोभाने आरोप केला की, अनुजची तिच्या १० वर्षांच्या मुलीवरही वाईट नजर होती. तसेच, शोभाच्या लहान बहिणीचा विनयभंग केल्याप्रकरणी तो यापूर्वी तुरुंगातही जाऊन आला होता. तो वारंवार पैशांसाठी शोभाला मारहाण करत असे.
२८ एप्रिलच्या रात्री अनुजने शोभाला एका कॅफेमध्ये नेले आणि त्यानंतर एका निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. या अत्याचारामुळे शोभा पूर्णपणे खचली होती. सुरुवातीला तिने आत्महत्येचा विचार केला, पण आपल्या पश्चात मुलीचे काय होईल या भीतीने तिने अनुजचाच काटा काढण्याचे ठरवले. संधी मिळताच तिने अनुजचेच देशी बनावटीचे पिस्तूल घेतले आणि त्याच्यावर गोळ्या झाडल्या.
पोलिसांची कारवाई
पोलिसांनी सांगितले की, शोभा राणीच्या अटकेनंतर हत्येसाठी वापरलेले शस्त्र जप्त करण्यात आले आहे. तिला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने तिची रवानगी तुरुंगात केली आहे.
Web Summary : In UP's Bijnor, a woman killed her live-in partner, Anuj Kumar, with his gun due to constant abuse, blackmail, and fears for her daughter's safety. She was arrested, confessing to the crime after enduring repeated sexual assaults and threats.
Web Summary : यूपी के बिजनौर में एक महिला ने अपने लिव-इन पार्टनर अनुज कुमार की हत्या कर दी। महिला ने उत्पीड़न, ब्लैकमेलिंग और बेटी पर बुरी नजर रखने के कारण अनुज को उसकी बंदूक से गोली मार दी। पुलिस ने महिला को गिरफ्तार कर लिया है।