काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला होता, ज्यामध्ये एक महिला वाहतूक कोंडीमुळे संतापून थेट भाजपचे वजनदार मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारताना दिसली होती. या धाडसी महिलेचे नाव टीना चौधरी असून, या सर्व प्रकरणावर आता तिने स्वतः समोर येत आपली सविस्तर बाजू मांडली आहे. "माझी सुरक्षितता आणि कुटुंबाबद्दल काळजी व्यक्त करणाऱ्या सर्वांचे आभार, पण मी का आक्रमक झाले हे समजून घेणं गरजेचं आहे," असे टीना यांनी म्हटले आहे.
नेमकी काय घडली होती घटना?
ही घटना २१ एप्रिलची आहे. टीना चौधरी आपल्या मुलीला म्युझिक क्लासवरून आणण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या. दुपारी ४:४५ ला त्या मुलीला पिकअप करणार होत्या, मात्र वाटेतच त्या वाहतूक कोंडीत अडकल्या. सुमारे २५ मिनिटे त्या गाडीतच होत्या. जेव्हा वाहतूक अजिबात हलली नाही, तेव्हा त्या नेमकी अडचण काय आहे हे पाहण्यासाठी गाडीतून खाली उतरल्या.
"दीड तास पोलिसांकडे विनवण्या केल्या, पण..."
टीनाने आपल्या निवेदनात सांगितले की, रस्त्यात दोन मोठ्या बस उभ्या होत्या, ज्यामुळे रस्ता पूर्णपणे ब्लॉक झाला होता. "पुढील दीड तास मी तिथे असलेल्या प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याकडे गेले, त्यांना विनंती केली, पण कुणीही माझे ऐकले नाही. पोलिसांकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने माझा संयम सुटला. केवळ पोलिसांचे लक्ष वेधून घेण्यासाठी मी पाण्याची बाटली जमिनीवर फेकली होती," असे टीना यांनी स्पष्ट केले.
लष्करी वारसा आणि वर्दीचा आदर
आपल्या कुटुंबाबद्दल बोलताना टीना भावूक झाल्या. "माझे आजोबा आणि वडील भारतीय सैन्यात होते. वडिलांनी देशासाठी दोन युद्धे लढली आहेत. माझ्या कुटुंबातील ८ जण लष्करात सेवा देत आहेत. त्यामुळे मला वर्दीचा आदर आहे. पण जेव्हा तुम्ही वर्दी घालता, तेव्हा तुम्ही जनतेचे सेवक असता. तुम्हाला लोकांचा अनादर करण्याचा किंवा त्यांना धमकावण्याचा अधिकार मिळत नाही," अशा शब्दांत त्यांनी पोलिसांच्या भूमिकेवर टीका केली.
मंत्री गिरीश महाजनांशी संवाद
संध्याकाळचे सव्वा सहा वाजले होते आणि टीनाला आपल्या मुलीची काळजी वाटत होती. त्यावेळी तिथे मंत्री गिरीश महाजन यांची रॅली आली. टीना यांनी सांगितले की, "रॅलीतील लोकां पैकी केवळ महाजन यांनीच माझे म्हणणे ऐकण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या सूचनेनंतरच त्या दोन बस बाजूला करण्यात आल्या आणि रस्ता मोकळा झाला."
"माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण करू नका"
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काही लोकांनी याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला. त्यावर टीना यांनी स्पष्ट बजावले आहे की, "कृपया माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून कोणीही राजकीय निशाणा साधू नका. सर्वच राजकीय पक्ष सामान्य जनतेच्या त्रासाकडे दुर्लक्ष करतात. मी कुणाचा आवाज बनण्याची गरज नाही, तुमच्याकडे तुमचा स्वतःचा आवाज आहे, तो वापरा."
Web Summary : Tina Choudhary, who questioned Minister Girish Mahajan about traffic, explains she acted after police inaction. Delayed, worried about her daughter, she sought help, but was ignored. Mahajan intervened, clearing the road. She denies political motives, advocating for citizens to voice concerns.
Web Summary : मंत्री गिरीश महाजन से ट्रैफिक के बारे में सवाल करने वाली टीना चौधरी ने कहा कि उन्होंने पुलिस की निष्क्रियता के बाद ऐसा किया। बेटी के लिए चिंतित होकर मदद मांगी, पर अनसुनी कर दी गई। महाजन ने हस्तक्षेप कर रास्ता खुलवाया। उन्होंने राजनीतिक मकसद से इनकार किया, नागरिकों से आवाज उठाने की अपील की।