रील बनवण्याचे वेड अन् दोन प्रियकरांचे लफडे; भरल्या घरात बेसबॉल बॅटने नव्या बॉयफ्रेंडचा खेळ खलास
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2026 09:59 IST2026-05-11T09:58:39+5:302026-05-11T09:59:37+5:30
Crime News : जुन्या प्रियकराने रीना नावाच्या महिलेसोबत मिळून राजस्थानच्या वीरू जाटची हत्या केली.

रील बनवण्याचे वेड अन् दोन प्रियकरांचे लफडे; भरल्या घरात बेसबॉल बॅटने नव्या बॉयफ्रेंडचा खेळ खलास
सोशल मीडियावरील प्रेमसंबंध आणि रिल्स बनवण्याचे वेड एका तरुणाच्या जीवावर बेतल्याची खळबळजनक घटना मध्य प्रदेशात उघडकीस आली आहे. इंस्टाग्रामवर ओळख झालेल्या प्रेयसीला भेटण्यासाठी ९०० किलोमीटरचा प्रवास करून आलेल्या राजस्थानच्या वीरू जाट ऊर्फ पप्पू याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ज्या महिलेवर वीरूने प्रेम केले, त्याच रीना किरारने आपल्या जुन्या प्रियकराच्या मदतीने ही हत्या घडवून आणली.
राजस्थानच्या भिलवाडा येथील ३२ वर्षीय वीरू जाट याचे नरसिंगपूरमधील विवाहित महिला रीना किरार हिच्याशी इंस्टाग्रामवर सूत जुळले होते. रीनाला फोटो आणि रिल्स पोस्ट करण्याची प्रचंड आवड होती. ३ वर्षांपूर्वी वीरूने तिच्या फोटोवर लाईक आणि कमेंट्स करण्यास सुरुवात केली. हळूहळू या संभाषणाचे रूपांतर प्रेमात झाले. वीरू वारंवार तिला भेटण्यासाठी राजस्थानहून मध्य प्रदेशात येत असे. मात्र, रीनाचा दुसरा प्रियकर अरुण पटेल याला ही गोष्ट खटकत होती. अरुण हा रीनाचा मावसभाऊ असून तो तिचा घरखर्च चालवत होता. त्याने तिला महागडी कार आणि सोन्याचे दागिनेही घेऊन दिले होते.
बेसबॉल बॅटने केला वार, मग पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न!
२९ एप्रिल रोजी रीनाने एका कटानुसार वीरूला आपल्या साईखेडा येथील घरी बोलावले. वीरू घरात शिरताच तिथे आधीच दबा धरून बसलेल्या अरुण पटेल आणि हरनाम किरार यांनी त्याच्यावर बेसबॉल बॅटने हल्ला केला. डोक्यावर वर्मी घाव बसल्याने वीरूचा जागीच मृत्यू झाला. यानंतर तिघांनी घराचा रक्ताचा सडा पुसून काढला, मृतदेहाचे हात-पाय बांधले, तोंडाला टेप लावली आणि प्रेत पोत्यात भरून कारच्या डिक्कीतून २०० किमी दूर रायसेन जिल्ह्यातील एका दरीत फेकून दिले.
उज्जैनमध्ये पोलिसांनी आवळल्या मुसक्या
रायसेन जिल्ह्यातील टेडिया पुलाखाली पोत्यात बंद असलेला अनोळखी मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपासाचे चक्र फिरवले. मोबाईल लोकेशन आणि कॉल डिटेल्सवरून पोलिसांचा संशय रीनावर बळावला. हत्या केल्यानंतर आरोपी मुंबई, कल्याण, इटारसी आणि इंदूर अशा विविध शहरांत लपून राहत होते. अखेर पोलिसांनी उज्जैनमधून रीना, अरुण आणि हरनाम या तिघांनाही अटक केली.
हत्येचा बनाव फसला!
रायसेन पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी दुसऱ्या जिल्ह्यात मृतदेह फेकला जेणेकरून तपास भरकटला जाईल. मात्र, पोलिसांनी चोख तपास करत हत्येत वापरलेली बॅट आणि कार जप्त केली आहे. सध्या तिन्ही आरोपी पोलीस कोठडीत असून, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.