थरकाप उडवणारा सूड! भरदिवसा घरात घुसून महिलेने संपविले महिलेला; जुना वाद ठरला कारण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 13:22 IST2026-04-23T13:19:47+5:302026-04-23T13:22:41+5:30

बजाजनगर मर्डर मिस्ट्री: सासूसमोरच सुनेची गळा चिरून हत्या; घरात घुसून लावली कडी अन् चाकूने केले सपासप वार.

Revenge Plot in Chhatrapati Sambhajinagar! Woman Kills Neighbor in Front of Mother-in-Law; Pistol and Spray Used | थरकाप उडवणारा सूड! भरदिवसा घरात घुसून महिलेने संपविले महिलेला; जुना वाद ठरला कारण?

थरकाप उडवणारा सूड! भरदिवसा घरात घुसून महिलेने संपविले महिलेला; जुना वाद ठरला कारण?

वाळूज महानगर : जुन्या वादाचा तणाव आणि मनात साचलेला संताप यांचा भीषण स्फोट बुधवारी सकाळी बजाजनगरच्या साई श्रद्धा पार्कमध्ये पाहायला मिळाला. एका महिलेने थेट घरात घुसून जीवघेणा हल्ला करत चाकूने सपासप वार करीत एका विवाहितेची निर्घृण हत्या केली. दिवसाढवळ्या, लोकवस्तीच्या मध्यभागी घडलेल्या या रक्तरंजित घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला.

साधना महेंद्र सोनपेटकर ( ४०, रा. साई श्रद्धा पार्क, वडगाव को.) असे मृत महिलेचे नाव आहे. शैला सुनील सोनार ( ४५, रा. बजाजनगर) या आरोपी महिलेस पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतले. या घटनेने वाळूज महानगर परिसर अक्षरशः हादरला. बुधवारी सकाळी ९:३० वाजेच्या सुमारास आरोपी शैला ही साधना सोनपेटकर यांच्या घरी आली तेव्हा घरात साधनाच्या सासू केशरबाई एकट्याच होत्या. शैलाने त्यांना साधना कुठेय? असे विचारले. केशरबाई यांनी ती मंदिरात गेल्याचे सांगितले. तेव्हा, आरोपी तिथेच थांबली. साधना घरी आल्या व त्यांनी शैलाला तेथे पाहून तू इथे का आलीस? असा जाब विचारला. त्यावरून दोघींत बाचाबाची सुरू झाली. शैलाने सोबत घराचा दरवाजा आतून बंद केला आणि सोबत आणलेले कुलूप लावले. त्यानंतर तिने साधना यांचे पती महेंद्र सोनपेटकर यांच्याबाबत चौकशी करत वाद घालण्यास सुरुवात केली. साधना आणि शैला यांच्यातील वाद विकोपाला गेला.

सासूने धैर्याने हल्ला परतवला मात्र...
वाद वाढताच आरोपीने तिच्या पर्समधून पिस्टल काढून साधनाच्या डोक्याला लावली आणि संपूर्ण कुटुंब संपवण्याची धमकी दिली. केशरबाईंनी धाडस दाखवत तिच्या हाताला झटका देऊन पिस्टल खाली पाडली व उचलून खिडकीतून बाहेर फेकून दिली. मात्र, आरोपीने नंतर पर्समधून रासायनिक स्प्रे काढून साधना आणि केशरबाई यांच्या चेहऱ्यावर फवारला. स्प्रेमुळे साधना खाली कोसळल्या, तर केशरबाई यांनाही तीव्र जळजळ होऊ लागली. या संधीचा फायदा घेत आरोपीने धारदार चाकू काढून साधनावर सपासप वार करण्यास सुरुवात केली.

चाकूने सपासप वार...
गळा, पोट, मान, डोके आणि पाठीवर खोलवर वार करत ' बोल आता बोल' म्हणत तिने साधनाची निर्दयपणे हत्या केली. काही क्षणांतच साधना रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या. केशरबाईंनी सुनेला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपीने त्यांना धक्का देत खाली पाडले. वयोमानामुळे त्या अधिक प्रतिकार करू शकल्या नाहीत. हत्येनंतर आरोपीने स्वतःलाही किरकोळ जखमी केले आणि बाथरूममध्ये जाऊन हात व चाकू धुतला.

खून केल्यानंतरही तेथे बसून...
खून केल्यानंतर ती घरातच थांबून मोबाइलवर कोणाशी तरी बोलत होती. दरम्यान, केशरबाईंनी आरडाओरड केल्याने परिसरातील नागरिक जमा झाले, मात्र दरवाजा आतून बंद असल्याने कोणीही आत प्रवेश करू शकले नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक रामेश्वर गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वाळूज एमआयडीसी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. दरवाजा तोडून पोलिस घरात शिरले व प्रसंगावधान राखत तिला ताब्यात घेतले. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात रक्त सांडलेले होते. पोलिसांनी पंचनामा करत चाकू, पिस्तूलसदृश वस्तू आणि इतर पुरावे जप्त केले .

फिर्यादीत काय?
मृत साधनाच्या सासू केशरबाई सोनपेटकर यांनी दिलेल्या फिर्यादीत आरोपीने घरात जबरदस्तीने घुसून बंदुकीचा धाक दाखवला, स्प्रे मारून निष्क्रिय केले आणि चाकूने वार करत सुनेची हत्या केल्याचे म्हटले आहे.

हत्येनंतर आत्महत्येचा प्रयत्न?
साधना यांची हत्या केल्यानंतर आरोपी शैलाने घरातील फॅनला ओढणी बांधून गळफास घेण्याचा प्रयत्न तिने केल्याचे सांगितले जात आहे. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून तिला ताब्यात घेतले.

२०२४ मध्ये दाखल गुन्हा; दीर्घकाळाचा वाद ठरला पार्श्वभूमी?
आरोपीने एप्रिल–मे २०२४ दरम्यान वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात महेंद्र सोनपेटकर यांच्या विरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल केला होता. तिने २०११ साली जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप करत, लग्नाचे आमिष दाखवून दीर्घकाळ संबंध ठेवले, मानसिक व शारीरिक छळ केल्याचे नमूद केले होते, तसेच पैशांच्या व्यवहारावरून वाद, दिलेला चेक न वटणे, धमक्या देणे आणि २०२४ मध्ये कंपनीत काम करताना ढकलल्याने मशीनमध्ये हात अडकून गंभीर दुखापत झाल्याचाही उल्लेख फिर्यादीत केला होता. यामुळे दोघांमध्ये तणाव होता. सदर प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

शेजाऱ्यांना अतीव दु:ख
मृत साधना यांना दोन मुले आहेत. त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच परिसरातील शेजाऱ्यांनी एकच टाहो फोडला. साधना यांचा स्वभाव शांत, मनमिळाऊ आणि सर्वांशी आपुलकीने वागणारा असल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले.

Web Title : बदला! दिनदहाड़े महिला ने दूसरी महिला की हत्या की; 2024 का विवाद कारण?

Web Summary : बजाजनगर में एक महिला ने पुराने विवाद के चलते विवाहित महिला की बेरहमी से हत्या कर दी। हमलावर पीड़िता के घर में घुसी, उसे बार-बार चाकू मारा और गिरफ्तार हो गई। 2024 में दर्ज एक पुरानी पुलिस शिकायत ने घातक कृत्य को हवा दी।

Web Title : Revenge! Woman Kills Another in Broad Daylight; 2024 Dispute the Cause?

Web Summary : A woman brutally murdered a married woman in Bajajnagar over a long-standing dispute. The attacker entered the victim's home, stabbed her repeatedly, and was arrested. A past police complaint filed in 2024 fueled the deadly act.