पाठलाग करत छेडछाड, प्राध्यापिकेने जाब विचारताच बोबडी वळली; विकृताला जमावाने तुडवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 15:10 IST2026-05-04T15:09:59+5:302026-05-04T15:10:23+5:30
प्राध्यापिकेचा पाठलाग करणाऱ्या विकृताला जमावाने तुडवले; छत्रपती संभाजीनगरातील धक्कादायक घटना.

पाठलाग करत छेडछाड, प्राध्यापिकेने जाब विचारताच बोबडी वळली; विकृताला जमावाने तुडवले
छत्रपती संभाजीनगर: एका खाजगी महाविद्यालयात प्राध्यापिका असलेल्या २६ वर्षीय तरुणीचा दुचाकीने पाठलाग करून अश्लील छेड काढणाऱ्या विकृताला शनिवारी सकाळी एमजीएम परिसरात जमावाने बेदम चोप दिला. तैबान कलीम खान (२५, रा. कैलासनगर) असे या विकृताचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
सात दिवसांपासून सुरू होता त्रास
सदर प्राध्यापिका रोज सकाळी ९:३० वाजता मोंढा नाका, सेव्हन हिल मार्गे महाविद्यालयात जाते. गेल्या सात-आठ दिवसांपासून आरोपी तैबान हा तिचा सातत्याने पाठलाग करत होता. सुरुवातीला दुर्लक्ष केल्यानंतर आरोपीने अश्लील इशारे करण्यास सुरुवात केली. अखेर शनिवारी सकाळी १० वाजता प्राध्यापिकेने त्याला एमजीएम परिसरात थांबवून जाब विचारला.
जमावाचा संताप आणि अटक
जाब विचारला असता आरोपीने उलट तरुणीसोबत उद्धट भाषेत वाद घालण्यास सुरुवात केली. हा गोंधळ पाहून परिसरातील नागरिक आणि तरुणीच्या भावाचा मित्र तेथे धावून आले. संतापलेल्या जमावाने आरोपीला चांगलाच चोप दिला. या प्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कारवाई सुरू आहे.