छत्रपती संभाजीनगर पाणीपुरवठा योजना ३०० कोटींनी महागणार, ३ हजार कोटींच्या पुढे जाणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 20:10 IST2025-11-27T20:09:12+5:302025-11-27T20:10:47+5:30
कंत्राटदाराला दरवाढ देण्याच्या हालचाली

छत्रपती संभाजीनगर पाणीपुरवठा योजना ३०० कोटींनी महागणार, ३ हजार कोटींच्या पुढे जाणार?
छत्रपती संभाजीनगर : शहर पाणीपुरवठा योजनेचे काम सध्या २७४० कोटी रुपयांतून होत आहे. २०२०-२१ च्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि कंत्राटदार जी.व्ही.पी.आर. इंजिनीअरिंग प्रा. लि. हैद्राबाद यांच्यातील करारानुसार योजनेचे काम पाच वर्षांपासून सुरू आहे. २०१९-२० साली योजनेची निविदेदरम्यान मूळ किंमत १६८० कोटी इतकी होती. १ हजार ६० कोटी रुपयांची भाववाढ मागील तीन वर्षांत या योजनेसाठी मिळालेली असताना, आता पुन्हा पाणीपुरवठा योजनेतील शिल्लक कामांचा विचार करून कंत्राटदाराला भाववाढ देण्याच्या प्रस्तावासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. योजना अंतिम टप्प्यात असली तरी तांत्रिक, किचकट कामे वेळखाऊ आहेत. त्यामुळे शिल्लक कामांसाठी २५० ते ३०० कोटींचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याची तयारी सुरू असून, ३ हजार कोटींच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत शहर पाणीपुरवठा योजनेला २०१९ मध्ये मान्यता मिळाली. या योजनेचा अमृत २.० योजनेत समावेश करून त्यास सुधारीत मंजूरी घेण्यात आली. जायकवाडी धरणातील उद्भव विहिरी (जॅकवेल) पासून ते नक्षत्रवाडी येथील जलशुद्धीकरण केंद्र, अशुद्ध जलवाहिनी, शुद्ध जलवाहिनी, ५५ पाण्यांच्या टाक्या, जलशुद्धीकरण केंद्र फारोळा, ॲप्रोच ब्रिजसह इतर कामे अंतिम टप्प्यात आहेत.
विभागीय आयुक्त तथा पाणीपुरवठा योजना उच्च न्यायालय नियुक्त समिती अध्यक्ष जितेंद्र पापळकर यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले, योजनेचे काम अंतिम टप्प्यात आहे. तांत्रिक कामे बाकी आहेत. एकूण योजनेची कुठली कामे शिल्लक आहेत, सध्या तरतुदीतून किती रक्कम अदा केलेली आहे, या सगळ्या बाबींचे मूल्यांकन करून गरज वाटल्यास पुढील विचार होईल.
त्या पत्राबाबत काहीही माहिती नाही
शहर पाणीपुरवठा योजनेचे कंत्राटदार जी.व्ही.पी.आर. इंजिनीअरिंग प्रा.लि. हैद्राबाद यांनी असाधारण भाववाढ किंवा फरक मागणीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे पत्र दिले होते. त्यावरून प्राधिकरणाने १० ऑक्टोबर २०२५ रोजी भाववाढ फरक प्रस्तावाबाबत कंत्राटदाराला दिलेले पत्र २५ ऑक्टोबरला मागे घेतले होते. सध्या योजना २७४० कोटी रुपयांपर्यंत गेलेली आहे. याबाबत विभागीय आयुक्त पापळकर यांना विचारले असता ते म्हणाले, प्राधिकरणाच्या पत्राबाबत माझ्याकडे कुठलीही माहिती नाही. जीवन प्राधिकरणाने कंत्राटदारासोबत असा काही पत्रव्यवहार झाला आहे, याबाबतही काही सांगितले नाही. मात्र, योजनेच्यापूर्वीच्या निविदेमध्ये नसलेली काही नवीन कामे वाढण्याची शक्यता आहे. त्याबाबत शासनाने माहिती मागितली आहे.
दरवाढ देण्याची गरज काय?
योजनेला मागेच १ हजार कोटींची दरवाढ दिली आहे. आता कंत्राटदाराला वाढीव फरकाची रक्कम दरवाढ म्हणून देण्याची गरज नाही. कुठल्याही दरात सध्या बदल झालेला नाही. त्यामुळे योजनेचे काम वेळेत करून घेणे गरजेचे आहे.