Motivational Story: कागदावर लिहिला फक्त 'एक' शब्द आणि अख्खं कुटुंब एकत्र आलं; वाचा ही जपानची बोध कथा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2026 08:10 IST2026-05-09T08:07:00+5:302026-05-09T08:10:01+5:30
Motivational Story: आपण सर्वांनी बालपणी एकत्र कुटुंब पद्धतीचा आनंद अनुभवला आहे, जपानमधल्या गृहस्थाने तो आनंद कसा टिकवला याची गोष्ट.

Motivational Story: कागदावर लिहिला फक्त 'एक' शब्द आणि अख्खं कुटुंब एकत्र आलं; वाचा ही जपानची बोध कथा
प्राचीन जपानमध्ये 'ओ-चो-सान' नावाचे एक गृहस्थ राहत होते. त्यांचं कुटुंब काही साधंसुधं नव्हतं; त्यांच्या कुटुंबात तब्बल एक हजार सदस्य होते! आश्चर्याची गोष्ट म्हणजे, एवढं मोठं कुटुंब असूनही त्यांच्या घरात कधीही भांडण-तंटा किंवा कुरबुरी होत नसत. सर्वजण एकमेकांशी अत्यंत प्रेमाने आणि आदराने वागत.
हे ही वाचा : स्वप्न शास्त्र: श्रीमंत व्हायचंय? मग स्वप्नात दिसलेल्या 'या' गोष्टी कोणालाही सांगू नका
या कुटुंबाच्या एकतेची आणि सुखाची कीर्ती पसरत पसरत जपानचे सम्राट यामातो यांच्या कानावर गेली. सम्राटांना या गोष्टीवर अजिबात विश्वास बसेना. त्यांना वाटलं, "एका घरात चार माणसं असली तरी तिथे खटके उडतात, मग जिथे हजार लोक आहेत तिथे वाद होणार नाहीत हे कसं शक्य आहे?"
सत्य जाणून घेण्यासाठी सम्राट स्वतः ओ-चो-सान यांच्या घरी पोहोचले. तिथे गेल्यावर सम्राटांनी पाहिलं की, खरोखरच प्रत्येक सदस्याच्या चेहऱ्यावर एक विलक्षण समाधान आणि आनंद होता. घरातील वातावरण एखाद्या मंदिरासारखं शांत आणि पवित्र होतं.
हे ही वाचा : Chanakya Niti: गर्दीत तुमची 'छाप' पाडायचीय? मग चाणक्य नीतीचे हे १० नियम कधीच विसरू नका!
सम्राटांनी कुतूहलाने ओ-चो-सान यांना विचारलं, "तुमच्या या अफाट कुटुंबाच्या सुखाचं आणि एकतेचं रहस्य काय आहे? एवढी माणसं तुम्ही एकत्र कशी काय बांधून ठेवलीत?"
ओ-चो-सान आता खूप वृद्ध आणि अशक्त झाले होते. ते जास्त बोलू शकत नव्हते. त्यांनी आपल्या थरथरत्या हातांनी कागदाचा एक तुकडा घेतला, त्यावर एक शब्द लिहिला आणि तो सम्राटांकडे सरकवला.
सम्राटांनी उत्सुकतेने त्या कागदावर नजर टाकली. त्यावर फक्त एकच शब्द लिहिला होता:
'सहनशीलता'
सम्राटांच्या चेहऱ्यावरचं आश्चर्य पाहून ओ-चो-सान हळू आवाजात म्हणाले, "महाराज, माझ्या कुटुंबाच्या सुखाचे रहस्य याच एका शब्दात दडले आहे. जिथे सहनशीलता असते तिथे राग (क्रोध) जन्म घेत नाही. जिथे राग नसतो तिथे आपोआपच मतभेद किंवा भांडण होत नाही. आणि जिथे भांडण नसतं, तिथे कुटुंब कधीच विखुरत नाही."
हे ही वाचा : Garud Puran: मुखाग्नी केवळ मुलगाच देऊ शकतो का? गरुड पुराणात याबाबत काय लिहिलंय पाहा
सम्राटांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं होतं. त्यांना उमजलं की, नाती टिकवण्यासाठी हुशारीपेक्षा 'सहनशीलता' जास्त महत्त्वाची असते.
कुटुंब किंवा नातं कितीही मोठं असलं, तरी ते पैशावर नाही तर एकमेकांचे स्वभाव समजून घेण्यावर आणि ते 'सहन' करण्यावर टिकतं. जिथे समजून घेण्याची वृत्ती असते, तिथे सुख नांदतं.