मोक्षदा एकदाशी २०२५: ‘या’ २ खास कारणांमुळे ही एकादशी ठरते अगदी विशेष अन् वेगळी; कशी? वाचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2025 14:27 IST2025-11-30T14:23:23+5:302025-11-30T14:27:18+5:30
Mokshada Ekadashi 2025: वर्षभरात येणाऱ्या इतर एकादशींपेक्षा मार्गशीर्ष महिन्यातील मोक्षदा एकादशी विशेष आणि खास ठरण्याची कारणे तुम्हाला माहिती आहेत का? जाणून घ्या...

मोक्षदा एकदाशी २०२५: ‘या’ २ खास कारणांमुळे ही एकादशी ठरते अगदी विशेष अन् वेगळी; कशी? वाचा
Mokshada Ekadashi 2025: मार्गशीर्ष मास हा केशव मास म्हणूनही ओळखला जातो. कारण या महिन्याचे पालकत्व भगवान महाविष्णू यांच्याकडे असते. गीतेमध्ये दहाव्या अध्यायात विभूतीयोग सांगताना भगवंतांनी ‘मासानां मार्गशीर्षोऽहम’ म्हणजे मार्गशीर्ष महिन्यात मी असतो, असे म्हटले आहे. मार्गशीर्ष महिन्याच्या शुद्ध पक्षातील एकादशी मोक्षदा एकादशी म्हणून ओळखली जाते. याच दिवशी गीता जयंती असते. परंतु, मोक्षदा एकदाशी ही विशेष आणि वेगळी ठरण्याची दोन खास कारणे सांगितली जातात.
मोक्षदा एकदाशी २०२५: ‘असे’ करा व्रत, वाचा, महती अन् महत्त्व; मोक्ष प्राप्तीचा सापडेल मार्ग!
सोमवार, ०१ डिसेंबर २०२५ रोजी मोक्षदा एकादशी आहे. याच दिवशी गीता जयंती आहे. विशेष म्हणजे यंदाची मार्गशीर्ष शुद्ध मोक्षदा एकादशी अशुभ, अमंगलाचे सूचक मानल्या गेलेल्या पंचक काळात असणार आहे. गुरुवारी सुरू झालेले पंचक सोमवार, ०१ डिसेंबर २०२५ रोजी रात्री ११ वाजून १८ मिनिटांनी संपणार आहे. मोक्षदा एकदाशी ही ०१ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ०७ वाजून ०१ मिनिटांपर्यंत आहे. मोक्षदा एकादशी विविध नावांनी ओळखली जाते. वैकुंठ एकादशी, मुक्कोटी एकादशी, धनुर्मास एकादशी अशी तिची नावे आहेत. नावे अनेक असली, तरी एकादशीचे महत्त्व सारखेच आहे. पापनाश होऊन मोक्ष मिळण्यासाठी मोक्षदा एकादशीचा उपास जरूर करावा आणि श्रीविष्णूंची पूजा-अर्चा करावी. तसेच या दिवशी गीता जयंती असल्याने गीता पठणास सुरुवात करावी, असे सांगितले जाते.
२ खास कारणांमुळे मोक्षदा एकादशी ठरते विशेष
अन्य एकादशी व्रतांप्रमाणेच मोक्षदा एकादशीचे व्रताचरण करतात. परंतु, तरीही ही एकादशी इतर एकादशींपेक्षा दोन कारणांमुळे वेगळी आणि विशेष ठरते. एक म्हणजे 'मार्गशीर्ष' माझा महिना असे भगवंतांनी सांगितले आहे, त्यामुळे एकादशीला महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यातच याच एकादशीला प्रत्यक्ष भगवंतांनी महाभारत करुक्षेत्रावर युद्धप्रसंगी अर्जुनाला गीता सांगण्यास सुरुवात केली. मनुष्यप्राण्याला मोक्ष प्राप्त करण्यासाठी आवश्यक असे मार्गदर्शक विचार गीतेमध्ये आले आहेत. त्यामुळे ती मोक्षदा म्हणजे मोक्ष देणारी म्हणून गौरवली जाते. या दिवशी श्रीकृष्ण, व्यास आणि गीता यांची पूजा भक्तिपूर्वक केली जाते.
नियमितपणे गीता पठण करावे
या एकादशीला भगवंतांनी गीता सांगितली, त्याअर्थी गीतेचा हा जन्म दिवस म्हणून या तिथीला गीता जयंती असेही म्हणतात. संपूर्ण गीता मुखोद्गत असणारी अनेक मंडळी आहेत. आजच्या स्पर्धात्मक युगातही गीताभ्यासक मंडळी जगभरात आहेत. जे आपले मन:स्वास्थ्य गमावून बसले आहेत, त्यांनी गीतेचे नीत्य पठण केले पाहिजे. स्वत:च्या मनन, चिंतनातून, आचार, विचारातून व्यक्त कशी होईल, याचा विचार आणि प्रयत्न प्रत्येकाने अवश्य केले पाहिजे. या दिवशी प्रत्येकाने गीतेचा एक अध्याय स्वतंत्रपणे किंवा सामूहिक रितीने म्हटला पाहिजे. ज्यांना संस्कृत येत नसेल, त्यांनी विनोबा भावे यांनी लिहिलेल्या गीताईचे पठण केले पाहिजे, असे म्हटले जाते.