भर वाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2026 19:11 IST2026-04-19T19:06:09+5:302026-04-19T19:11:38+5:30
वाळवंटातील डोंगराळ रस्ते आणि जोरदार वाऱ्याने बॅटरी अपेक्षेपेक्षा थोडी लवकर संपली आणि कार भर वाळवंटातच बंद पडली. त्याने मदतीसाठी अनेकांना फोन केले, मात्र दुर्गम भाग असल्याने कोणीही पोहोचू शकले नाही.

भर वाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
जगभरातच इलेक्ट्रिक कारची लोकप्रियता सातत्याने वाढताना दिसत आहे. मात्र याच बरोबर या कार्सचा बॅटरी बॅकअप हाही एक महत्वाचा मुद्दा आहे. विशेषतः जेव्हा आपण एखाद्या निर्जन स्थळी जाता. असाच एक अत्यंत थरारक अनुभव आलाय युट्यूबर सँड्रो वॅन कुइज्क याला. कुइज्क जेव्हा चिलीतील अटाकामा वाळवंटातून (Atacama Desert) जात होता, तेव्हा भरवाळवंटात त्याच्या कारची बॅटरी अचानक संपली. मात्र, त्याने प्रसंगावधान दाखवत संकटातून सुखरूप स्वतःची सुटका केली.
नेमकं काय घडलं? -
सँड्रो आपल्या 'टेस्ला मॉडेल एक्स'सह (Tesla Model X) कॅनडा ते अर्जेंटिना अशा प्रवासावर होता. त्याच्या प्रवासादरम्यान पुढचे चार्जिंग स्टेशन ४२ किमी अंतरावर होते, तर कारमध्ये केवळ ३७ किमी एवढीच रेंज शिल्लक होती. वाळवंटातील डोंगराळ रस्ते आणि जोरदार वाऱ्याने बॅटरी अपेक्षेपेक्षा थोडी लवकर संपली आणि कार भर वाळवंटातच बंद पडली. त्याने मदतीसाठी अनेकांना फोन केले, मात्र दुर्गम भाग असल्याने कोणीही पोहोचू शकले नाही.
मदत मिळणे शक्य नाही हे लक्षात आल्यावर सँड्रोने कार चार्ज करण्यासाठी खास जुगाड केला. खरेतर, सँड्रोने आपल्या कारला चालते फिरते घराच बनवले आहे. या कारमध्ये बेड आणि किचनसारख्या सर्व सोयी सुविधा आहेत. अशा वेळी त्याने कारमधील सोलर पॅनेल्सचा वापर केला. त्याने रस्त्याच्या कडेला सोलर पॅनेल्स पसरवले आणि कार चार्ज करण्यास सुरुवात केली. मात्र, ही चार्जिंग प्रक्रिया फारच स्लो होती.
मात्र, हे सर्व सुरू असतानाच त्याला रस्त्यावर काम करणारे काही मजूर भेटले. त्यांच्याकडील मशीनच्या मदतीने कारला थोडी अधिक वीज मिळाली. अखेर एका ट्रकच्या सहाय्याने त्याने आपली कार जवळच्या शहरापर्यंत नेली. सँड्रोने या संपूर्ण थरारक प्रवासाचा व्हिडिओदेखील आपल्या युट्युब चॅनेलवर शेअर केला आहे. याची सध्या सोशल मीडियावर जबरदस्त चर्चा सुरू आहे.