"भाड्याच्या घरात राहण्यापेक्षा पैसे आण"; फ्लॅटसाठी पैशांचा तगादा, महिला डॉक्टरने संपवलं आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 19:33 IST2026-05-05T19:21:47+5:302026-05-05T19:33:51+5:30

अहिल्यानगरमध्ये सासरच्या छळाला कंटाळून एका डॉक्टर महिलेने टोकाचं पाऊल उचललं.

Ahilyanagar 26 Year Old Female Doctor Ends Life Following Alleged Harassment for Dowry | "भाड्याच्या घरात राहण्यापेक्षा पैसे आण"; फ्लॅटसाठी पैशांचा तगादा, महिला डॉक्टरने संपवलं आयुष्य

"भाड्याच्या घरात राहण्यापेक्षा पैसे आण"; फ्लॅटसाठी पैशांचा तगादा, महिला डॉक्टरने संपवलं आयुष्य

Ahilyanagar Crime : फ्लॅट घेण्यासाठी माहेराहून १२ लाख रुपये आणण्यासाठी सासरी होणाऱ्या छळाला कंटाळून २६ वर्षीय महिला डॉक्टरने गळफास घेऊन आत्महत्या केली. अहिल्यानगरच्या पारनेर तालुक्यातील गोरेगाव येथे शनिवारी ही घटना घडली.

डॉ. गौरी अमित दळवी-चौरे असे मृत विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी तिच्या वडिलांच्या तक्रारीवरून पती अमित बाबासाहेब दळवी, सासू संगीता बाबासाहेब दळवी, सासरा बाबासाहेब हरिभाऊ दळवी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सुनील जबाजी चौरे यांनी फिर्याद दिली. त्यानुसार गौरीचे लग्न २३ नोव्हेंबर २०२४ रोजी अमित बाबासाहेब दळवी याच्याशी झाले. मुंबईला गेल्यानंतर पती अमित दळवी याने फ्लॅट घेण्यासाठी माहेराहून १२ लाख रुपये आणण्यासाठी गौरीला त्रास देण्यास सुरुवात केली. 'तुम्ही साधे लग्न केले भाड्याच्या घरात राहण्यापेक्षा पैसे आण', असे म्हणून तिचा छळ केला. 

गौरी ही खासगी रुग्णालयात कार्यरत होती. तिचा पगारही काढून घेतला. लग्नातील दागिनेही बळकावल्याचे गौरीने आई-वडिलांना फोनवर सांगितले होते. पती अमित हा दारूच्या आहारी गेला होता. पैशांसाठी तो सतत तिला मारहाण करीत होता. तसेच त्याचे इतर मुलींशी अनैतिक संबंध असल्याचेही गौरीने फेब्रुवारी २०२६मध्ये माहेरी सांगितले होते. त्यानंतर तिची आई मुंबईला जाऊन वाद मिटवून आली. मात्र, त्यानंतरही छळ सुरू होता. 

दरम्यान, २७ एप्रिल रोजी गौरी, तिचा पती अमित आणि सासरे बाबासाहेब हे गोरेगाव येथे आले. त्यावेळी अमितने 'तू इथेच थांब, मी पप्पांना नगरला सोडून तुला घ्यायला येतो', असे सांगून निघून गेला. त्यानंतर तो परत आलाच नाही. फोनही घेत नव्हता. २८ एप्रिल रोजी गौरी व तिची आई अहिल्यानगर व मुंबई येथे गेली असता, दोन्ही ठिकाणी घरांना कुलूप लावले होते. त्यानंतर शनिवारी सकाळी गोरेगाव येथील घरात एकटी असताना गौरीने दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. आई शेतातून परत आल्यावर हा प्रकार समोर आला. तिला तातडीने पारनेर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

Web Title : फ्लैट के लिए दहेज की मांग से तंग आकर डॉक्टर ने की आत्महत्या

Web Summary : अहिल्यानगर में 26 वर्षीय महिला डॉक्टर ने फ्लैट खरीदने के लिए दहेज की मांग से तंग आकर आत्महत्या कर ली। पति और ससुराल वालों पर मामला दर्ज। उस पर पैसे का दबाव था, शारीरिक शोषण किया गया, और उसकी सैलरी छीन ली गई।

Web Title : Dowry Harassment Leads Doctor to Suicide Over Flat Money

Web Summary : A 26-year-old doctor in Ahilyanagar died by suicide due to harassment for dowry to buy a flat. Her husband and in-laws are booked. She was pressured for money, physically abused, and her salary was taken.