करमुसे मारहाण प्रकरण: सीबीआयच्या धास्तीपोटी Jitendra Awhad यांचे अटकनाट्य? न्यायालयात याचिका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2021 09:42 AM2021-10-16T09:42:26+5:302021-10-16T09:42:59+5:30

Jitendra Awhad News: अभियंता अनंत करमुसे मारहाण प्रकरणाचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) जाण्याच्या शक्यतेनेच गुरुवारी राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांचे अटकनाट्य झाल्याची चर्चा पोलीस आणि राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Karamuse assault case: Jitendra Awhad's arrest in fear of CBI? Petition in court | करमुसे मारहाण प्रकरण: सीबीआयच्या धास्तीपोटी Jitendra Awhad यांचे अटकनाट्य? न्यायालयात याचिका

करमुसे मारहाण प्रकरण: सीबीआयच्या धास्तीपोटी Jitendra Awhad यांचे अटकनाट्य? न्यायालयात याचिका

googlenewsNext

- जितेंद्र कालेकर
ठाणे : अभियंता अनंत करमुसे मारहाण प्रकरणाचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) जाण्याच्या शक्यतेनेच गुरुवारी राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांचे अटकनाट्य झाल्याची चर्चा पोलीस आणि राजकीय वर्तुळात रंगली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आव्हाड यांना आरोपी करावे आणि हा तपास सीबीआयकडे सोपवावा, अशी मागणी करमुसे यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेद्वारे रेटून धरली होती.

सोशल मीडियावर आव्हाड यांच्यासंदर्भातील आक्षेपार्ह पोस्ट करमुसे यांनी  व्हायरल केल्याचा आरोप होता. या प्रकरणामुळे त्यांच्या काही पोलीस अंगरक्षकांसह खासगी कार्यकर्त्यांनी  करमुसे यांना आव्हाड यांच्या ‘नाद’ बंगल्यावर नेले होते. तिथे आव्हाड यांच्यासमोरच त्यांना फायबरच्या काठीसह लोखंडी रॉडने जबर मारहाण केली होती. ५ एप्रिल रोजी रात्री ११.५०  ते ६ एप्रिल २०२०  रोजी सकाळी ६.२२ वाजेच्या दरम्यान हा प्रकार घडला होता. 
याप्रकरणी ६ एप्रिल रोजी वर्तकनगर पेालीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. यामध्ये मुंबई सुरक्षा दलातील हवालदार वैभव कदम, सुरेश जनाठे तसेच  ठाणे मुख्यालयातील पोलीस शिपाई सागर मोरे हे तीन पोलीस कर्मचारी तसेच अभिजित पवार, समीर पवार, हेमंत वाणी, सूरज यादव, ज्ञानोबा वाघमारे, दिलीप यादव या  खासगी कार्यकर्त्यांसह १२ जणांना अटक झाली होती. ठाणे पोलिसांनी मात्र यात १२ आरोपी अटक केल्याचे तसेच तपास नि:पक्षपणे होत असल्याचा दावा सुनावणीच्या वेळी केला. आता तपास सीबीआयकडे गेलाच तर केंद्रीय यंत्रणेकडून अटकेची नामुष्की  ओढवू शकली असती. जरी हा तपास सीबीआयकडे गेला तरी एका गुन्ह्यात एकदाच अटक होते. या सर्व बाबी विचारात घेऊन आव्हाड स्वत: वर्तकनगर पेालीस ठाण्यात गुरुवारी दुपारी हजर झाल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, १८ महिन्यांनी यात आव्हाड यांना आरोपी करून त्यांना गुरुवारी अटक केली. तरीही सीबीआयकडे हा तपास वर्ग करावा, या मागणीवर आपण ठाम असल्याचे  करमुसे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. 

‘गृहनिर्माणमंत्र्यांना निलंबित करा’
- अनंत करमुसे मारहाण प्रकरणात तीन पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. मात्र गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे राज्यपालांकडे आव्हाड यांच्यावरही निलंबनाची कारवाई करण्याची मागणी करणार असल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शुक्रवारी दिली. 
-गुरुवारी घडलेल्या आव्हाड यांच्या अटक आणि जामीन प्रकरणानंतर शुक्रवारी सोमय्या यांनी करमुसे यांची भेट घेतली. ठाकरे सरकार हे माफियांचे सरकार असल्याची टीका त्यांनी केली. आपल्यावरील हल्ल्याची सीबीआयमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी यावेळी अनंत करमुसे यांनी केली. या प्रकरणात मागील वर्षी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यात एक वर्षानंतर अटक आणि तत्काळ सुटका होते, हे अतिशय दुर्दैवी असल्याचेही करमुसे म्हणाले.

Web Title: Karamuse assault case: Jitendra Awhad's arrest in fear of CBI? Petition in court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.