'ती' अखेरची क्लिक ठरली जीवघेणी; हसत्या-खेळत्या तिघींचा धरणात करुण अंत! पोहण्याचा आनंद ठरला शेवटचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 22:07 IST2026-05-13T22:04:53+5:302026-05-13T22:07:14+5:30

अकरा वर्षीय स्वराला वाचवताना दोघींनीही प्राण गमावले

that last click turned out to be fatal three girls met a tragic end in the dam in vaibhavwadi | 'ती' अखेरची क्लिक ठरली जीवघेणी; हसत्या-खेळत्या तिघींचा धरणात करुण अंत! पोहण्याचा आनंद ठरला शेवटचा

'ती' अखेरची क्लिक ठरली जीवघेणी; हसत्या-खेळत्या तिघींचा धरणात करुण अंत! पोहण्याचा आनंद ठरला शेवटचा

लोकमत न्यूज नेटवर्क, वैभववाडी : तालुक्यातील करुळ - जामदारवाडी येथील धरणात पोहण्यासाठी गेलेल्या सात जणांपैकी तीन मुलींचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बुधवारी (दि. १३ मे रोजी) सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत तन्वी अनंत माळकर (१६, रा. करुळ), ऋतिका संतोष पाटील (१८, रा. करुळ) आणि स्वरा संदीप सुर्वे (११, रा. कुसूर) या तिघींचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेमुळे संपूर्ण वैभववाडी तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तन्वी, ऋतिका आणि स्वरा यांच्यासह करण वारंग, श्रुतिका वारंग, विराज पाटील आणि जार्गवी सुर्वे हे सात जण दुपारी चारच्या सुमारास जामदारवाडी धरणावर गेले होते. पाण्यात उतरल्यानंतर स्वराला पाण्याचा अंदाज न आल्याने ती बुडू लागली. तिला वाचवण्यासाठी गेलेल्या तन्वी आणि ऋतिका या दोघींचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. स्थानिक ग्रामस्थांनी धाव घेऊन तिघींनाही बाहेर काढले. परंतु, तोपर्यंत उशीर झाला होता. घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलिस अधीक्षक नयोनी साटम, तहसीलदार सूर्यकांत पाटील, पोलिस निरीक्षक मनोज सोनवलकर, सभापती सिद्धेश रावराणे, उपसभापती साची कोलते आणि नायब तहसीलदार दिलीप पाटील यांनी तातडीने ग्रामीण रुग्णालयात धाव घेऊन पीडित कुटुंबांचे सांत्वन केले.

भावंडांसमोरच ओढले मृत्यूने!

या दुर्घटनेचे भीषण वास्तव म्हणजे स्वराची बहीण जार्गवी आणि ऋतिकाचा भाऊ विराज हे दोघेही तिथे उपस्थित होते. आपल्या डोळ्यांसमोर आपल्या बहिणींना काळाने ओढल्याचे पाहून या लहान भावंडांनी घटनास्थळी फोडलेला हंबरडा उपस्थितांची मने हेलावून टाकणारा होता. एका क्षणात हसण्या -खिदळण्याचे रुपांतर आक्रोशात झाले.

आजीच्या कार्यासाठी आली अन्...

मृत स्वरा सुर्वे ही मुंबईत सहावीत शिकत होती. ती आजीच्या कार्यानिमित्त करुळ भोयडेवाडी येथे आली होती. तन्वी माळकर हिने नुकतीच दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली होती, तर ऋतिका पाटील ही मे महिन्याच्या सुट्टीसाठी मुंबईहून गावी आली होती. गावी सुट्टी घालवण्याचे त्यांचे स्वप्न अधुरेच राहिले.

'ती' ठरली अखेरची क्लिक!

धरणात उतरण्यापूर्वी या तिघी मैत्रिणींनी आनंदाने एकत्र सेल्फी काढला होता. हा फोटो काढल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच ही प्राणघातक दुर्घटना घडली. त्यांचा तो शेवटचा आनंद आणि हसरे चेहरे आता केवळ फोटोरुपाने नातेवाइकांच्या आठवणीत उरले आहेत.

Web Title : दर्दनाक अंत: तैरने से पहले की सेल्फी तीन लड़कियों के लिए घातक

Web Summary : वैभववाड़ी के करुल-जामदारवाड़ी बांध में तैरते समय तीन लड़कियों की डूबने से मौत हो गई। एक लड़की संघर्ष कर रही थी, और दो अन्य उसे बचाने की कोशिश में मर गईं। दुखद घटना बुधवार शाम को हुई, जिससे समुदाय शोक में डूब गया। कुछ समय पहले ली गई एक सेल्फी एक दुखद अंतिम स्मृति बन गई।

Web Title : Tragic End: Selfie Before Swim Turns Fatal for Three Girls

Web Summary : Three girls drowned in Karul-Jamdarwadi dam, वैभववाडी, while swimming. One girl struggled, and two others died trying to save her. The tragic incident occurred Wednesday evening, leaving the community in mourning. A selfie taken moments before became a heartbreaking last memory.