वैद्यकीय बिल मंजुरीसाठी लाचेची मागणी, सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयातील अधीक्षक एसीबीच्या जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 14:10 IST2026-05-13T14:09:03+5:302026-05-13T14:10:18+5:30
एकूण बिलाच्या ३ टक्केची मागणी

वैद्यकीय बिल मंजुरीसाठी लाचेची मागणी, सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयातील अधीक्षक एसीबीच्या जाळ्यात
ओरोस : सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालय, ओरोस येथील कार्यालयीन अधीक्षक महादेव नारायण तेली (५६, रा.कणकवली) यांना वैद्यकीय उपचारांचे बिल मंजूर करण्यासाठी लाचेची मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे जिल्हा रुग्णालय परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
एका ४९ वर्षीय तक्रारदाराने त्यांच्या वैद्यकीय उपचारांच्या बिलाची फाइल मंजुरीसाठी जिल्हा रुग्णालयात सादर केली होती. ही फाइल मंजूर करण्याच्या बदल्यात कार्यालयीन अधीक्षक महादेव तेली यांनी बिलात त्रुटी असल्याचे सांगून, एकूण बिलाच्या ३ टक्के म्हणजे १८ हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोडीनंतर १० हजार रुपये देण्याचे निश्चित झाले. मात्र, लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने कुडाळ येथील एसीबी कार्यालयात धाव घेतली.
तक्रारीची शहानिशा केल्यानंतर, एसीबीच्या पथकाने जिल्हा रुग्णालय परिसरात सापळा रचून संशयित आरोपी महादेव तेली याला ताब्यात घेतले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक शिवराज पाटील आणि अपर पोलिस अधीक्षक भागवत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक विजय पांचाळ, निरीक्षक दीपक माळी व पथकाने केली.
लाचेचे गणित आणि तडजोड
तक्रारदार : ४९ वर्षीय नागरिक.
बिलाची अट : उपचारांच्या बिलात त्रुटी असल्याचे सांगून अडवणूक.
मूळ मागणी : एकूण बिलाच्या ३ टक्के रक्कम (१८,००० रुपये).
निश्चित रक्कम : तडजोडीनंतर १०,००० रुपये देण्याचे ठरले होते.