बंदूक निर्मितीच्या कारखान्यावर छापा; वृद्धाला अटक, १ लाख १४ हजारांचा मुद्देमाल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 14:31 IST2026-04-29T14:31:10+5:302026-04-29T14:31:10+5:30
एका पत्र्याच्या शेडमध्ये ही घातक शस्त्रे बनवली जात होती.

बंदूक निर्मितीच्या कारखान्यावर छापा; वृद्धाला अटक, १ लाख १४ हजारांचा मुद्देमाल जप्त
कुडाळ : तालुक्यातील निरुखे सुतारवाडी येथे बेकायदेशीररीत्या सुरु असलेल्या बंदूकनिर्मितीच्या कारखान्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने सोमवारी मध्यरात्री छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी तीन तयार बंदुका, ६ लोखंडी बॅरल आणि शस्त्रे बनविण्याचे साहित्य असा एकूण १ लाख १४ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी जगन्नाथ शंकर मेस्त्री (वय ६५) यास अटक करण्यात आली आहे.
जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या 'ऑल आऊट ऑपरेशन' अंतर्गत गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक गस्तीवर असताना गोपनीय माहिती मिळाली होती. एका पत्र्याच्या शेडमध्ये ही घातक शस्त्रे बनविली जात असल्याचे समजताच पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने २७ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास कारवाई करून कारखाना उद्ध्वस्त केला.
यामध्ये तयार शस्त्रांसह ती बनविण्यासाठी लागणारे वेल्डिंग मशीन, ग्राइंडर आणि इतर तांत्रिक साहित्यही पोलिसांच्या हाती लागले. जगन्नाथ मेस्त्री कधीपासून या व्यवसायात होता याचा तपास पोलीस करत आहेत.