Satara News: मधमाश्यांच्या हल्ल्यात तीन महिला बेशुद्ध, कपडे धुण्यासाठी गेलेल्या नदीवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 16:00 IST2026-05-15T15:59:51+5:302026-05-15T16:00:34+5:30
पाळशी परिसरात सध्या पाण्याचे भीषण संकट

Satara News: मधमाश्यांच्या हल्ल्यात तीन महिला बेशुद्ध, कपडे धुण्यासाठी गेलेल्या नदीवर
सणबूर : पाळशी ता. पाटण येथे बुधवारी दुपारी एकच्या सुमारास कपडे धुण्यासाठी नदीवर गेलेल्या तीन महिला आणि दोन मुलींवर आग्या मोहळाच्या माशांनी हल्ला केला. या हल्ल्यात तीन महिला जागीच बेशुद्ध पडल्या असून, त्यांच्यावर ढेबेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सुनीता संदीप माने (वय ४०), यशोदा आत्माराम सावंत (६०), शांताबाई रघुनाथ माने (६०), आरोही संदीप माने (१२), दुर्वा सचिन माने (७) अशी जखमींची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पाळशी परिसरात सध्या पाण्याचे भीषण संकट उभे ठाकले आहे. गावात पाणी नसल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास गावातील महिला कपडे धुण्यासाठी नदीकडे निघाल्या होत्या. ‘धनगर गवन’ शिवारात पोहोचताच अचानक येथील आग्यामोहळाच्या माशांनी या महिलावर हल्ला चढवला.
या आग्या मोहाच्या माशांचा दंश इतका तीव्र होता की, यात तीन महिलांना असह्य वेदना होऊन त्या जागीच बेशुद्ध पडल्या. यावेळी जवळच असलेल्या शुभम माने या तरुणाने प्रसंगावधान राखत आरडाओरडा केला. त्याच्या आवाजामुळे गावकरी तातडीने मदतीला धावून आले. गावकऱ्यांनी तातडीने उपलब्ध वाहनांतून जखमींना ढेबेवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
सुनीता संदीप माने, यशोदा आत्माराम सावंत, शांताबाई रघुनाथ माने, आरोही संदीप माने, दुर्वा सचिन माने हे जखमी झाले. सध्या सर्वांची प्रकृती स्थिर असून, त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.
गावाला अगोदरच भीषण पाणीटंचाईने ग्रासले आहे. पाण्यासाठी महिलांना उन्हातान्हात शिवारात फिरावे लागते. त्यातच आता वन्यप्राण्यांचा आणि मधमाशांच्या हल्ल्यांचा उपद्रव वाढला आहे. शासनाने केवळ आश्वासन न देता, पाण्यासाठी आणि आमच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अन्यथा जगायचे कसे? असा प्रश्न पडला आहे. - सीताबाई पिसाळ, ग्रामस्थ, पाळशी