सातारा वस्तुसंग्रहालयात तीन नवी दालने झाली खुली, नेमकं काय पाहायला मिळणार..जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 12:07 IST2026-05-13T12:06:06+5:302026-05-13T12:07:26+5:30
मराठा साम्राज्याचा वैभवशाली वारसा आणि त्या काळातील समृद्ध जीवनशैली उलगडणारा हा अमूल्य ठेवा आता नागरिकांना जवळून अनुभवता येणार

सातारा वस्तुसंग्रहालयात तीन नवी दालने झाली खुली, नेमकं काय पाहायला मिळणार..जाणून घ्या
सातारा : ऐतिहासिक सातारानगरीच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला असून, येथील हजेरी माळावर दिमाखात उभ्या असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाने आपला विस्तार केला आहे. संग्रहालयात आता वस्त्र, चित्र आणि संकीर्ण अशी तीन नवी दालने इतिहासप्रेमींसाठी खुली करण्यात आली आहेत. मराठा साम्राज्याचा वैभवशाली वारसा आणि त्या काळातील समृद्ध जीवनशैली उलगडणारा हा अमूल्य ठेवा आता नागरिकांना जवळून अनुभवता येणार आहे.
अडीच हजाराहून अधिक वस्तूंचा संग्रह..
साताऱ्यातील हजेरी माळावर संग्रहालयाची इमारत ३० गुंठे क्षेत्रात उभी असून, येथे टप्प्याटप्प्याने विविध दालने विकसित केली जात आहेत. या संग्रहालयाकडे अडीच हजारांहून अधिक ऐतिहासिक वस्तूंचा मोठा साठा असून, त्यातील जवळपास ५० टक्के वस्तू आता या संग्रहालयात मांडण्यात आल्या आहेत. केवळ युद्धसाहित्यच नव्हे, तर त्या काळातील कला, संस्कृती आणि दैनंदिन व्यवहारातील बारकावे या दालनांतून समोर येत आहेत. राज्यभरातील पर्यटकांसाठी हे संग्रहालय आता केवळ माहितीचे केंद्र न राहता इतिहासाची अनुभूती देणारे एक महत्त्वाचे ठिकाण बनले आहे.
नव्या दालनांत काय पाहायला मिळणार?
१. या तीन नवीन दालनांमध्ये इतिहासाचे विविध पैलू अतिशय कल्पकतेने मांडले आहेत. वस्त्र दालनात नाना फडणवीस यांचा अंगरखा, छत्रपती शाहू महाराजांची मानचिन्हे, जिरेटोप, जरी शेला आणि विविध प्रकारच्या पगड्यांचे दर्शन घडते.
२. संकीर्ण दालनात प्राचीन मातीची भांडी, पितळी नक्षीदार थाळी, लाकडी मोजपात्रे आणि कंदील यांसारख्या वस्तू आहेत.
३. तर चित्र दालनात जयराम स्वामींचे वडगाव येथील दुर्मीळ भित्तिचित्रे आणि गंजिफा यांसारख्या कलाकृती पर्यटकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहेत. ही मांडणी इतिहासप्रेमींना एका वेगळ्याच कालखंडात घेऊन जाणारी आहे.
छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाला भेट देणाऱ्या पर्यटकांची ओढ लक्षात घेऊन आम्ही ही तीन नवी दालने सज्ज केली आहेत. या दालनांच्या माध्यमातून नागरिकांना अनेक ऐतिहासिक वस्तू, दुर्मीळ चित्रे आणि त्या काळातील वस्त्रे अतिशय जवळून पाहता येत आहेत. नागरिकांनी या संधीचा लाभ घेऊन आपला ऐतिहासिक वारसा समजून घ्यावा. - प्रवीण शिंदे, अभिरक्षक, छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय