SSC Result: उंडाळेतील मायलेक एकाचवेळी दहावी उत्तीर्ण, मुलाच्या आग्रहातून आईने ३९ व्या वर्षी दिली परीक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 15:11 IST2026-05-13T15:10:39+5:302026-05-13T15:11:14+5:30
पतीच्या निधनानंतर अत्यंत कठीण परिस्थितीत त्यांनी मुलाचा सांभाळ करत संसाराची जबाबदारी पेलली

SSC Result: उंडाळेतील मायलेक एकाचवेळी दहावी उत्तीर्ण, मुलाच्या आग्रहातून आईने ३९ व्या वर्षी दिली परीक्षा
उंडाळे : कराड तालुक्यातील उंडाळे येथील सविता दिलीप पाटील यांनी जिद्द, चिकाटी आणि शिक्षणाची ओढ याच्या बळावर वयाच्या ३९ व्या वर्षी स्वतःच्या मुलाबरोबर दहावीची परीक्षा देत यश मिळविले आहे. विशेष म्हणजे आईला ५९ टक्के तर मुलाला ८३ टक्के गुण मिळाल्याने गावात त्यांच्या यशाचे कौतुक होत आहे.
सविता पाटील यांना २००५ मध्ये आर्मी भरतीची इच्छा मनात असताना काही कौटुंबिक अडचणींमुळे दहावी पूर्ण करता आली नव्हती. त्यानंतर २००८ मध्ये उंडाळे येथील दिलीप पाटील यांच्याशी त्यांचा विवाह झाला. संसार सुरळीत सुरू असतानाच २०१७ मध्ये पतीचे निधन झाले. त्यानंतर अत्यंत कठीण परिस्थितीत त्यांनी मुलाचा सांभाळ करत संसाराची जबाबदारी पेलली.
यावर्षी मुलगा दहावीत असल्याने त्याने आईला देखील परीक्षा देण्याचा आग्रह धरला.
वय ३९ असताना आता शिक्षण घेऊन काय करणार, असा कोणताही विचार मनात न आणता मुलाच्या आग्रहास्तव त्यांनी स्वतःचाही फॉर्म भरला आणि टेलरिंग व्यवसाय, घरातील कामे तसेच शेतीची जबाबदारी सांभाळत मुलाबरोबर अभ्यास सुरू केला. शाळेतील पालक मिटिंगला पालक आणि विद्यार्थी अशी दुहेरी भूमिका सांभाळत अखेर दोघांनीही चांगल्या गुणांनी यश संपादन केले.
शिक्षण घेण्याची इच्छा होती, मात्र परिस्थितीमुळे शक्य झाले नाही. मुलाचा आग्रह, बचत गट, सासूबाईंचे प्रोत्साहन आणि प्रथम इन्स्टिट्यूटच्या सहकार्यामुळे हे शक्य झाले. या यशानंतर मी गावातील शिक्षण अपूर्ण राहिलेल्या दहा महिलांना पुढील शिक्षणासाठी प्रेरित केले आहे. ज्या महिलांना शिक्षण घेता आले नाही त्यांनी प्रयत्न जरूर करावेत, यश नक्की मिळते. मी पुढील शिक्षण चालू ठेवणार आहे - सविता दिलीप पाटील