साताऱ्यात धडामधूम, जोरदार वारा अन् पाऊस; झेडपी आवारात झाड पडल्याने १० दुचाकींचे नुकसान

By नितीन काळेल | Updated: May 13, 2026 20:32 IST2026-05-13T20:31:32+5:302026-05-13T20:32:48+5:30

वीज पडून १८ शेळ्या-मेंढ्या ठार, गायीचाही मृत्यू, जिल्ह्यात वळवाची वाऱ्यासह हजेरी

rain strong winds in satara 10 two wheeler damaged after tree falls in ZP premises | साताऱ्यात धडामधूम, जोरदार वारा अन् पाऊस; झेडपी आवारात झाड पडल्याने १० दुचाकींचे नुकसान

साताऱ्यात धडामधूम, जोरदार वारा अन् पाऊस; झेडपी आवारात झाड पडल्याने १० दुचाकींचे नुकसान

नितीन काळेल, लोकमत न्यूज नेटवर्क, सातारा : जिल्ह्यात उष्णतेची लाट आली असतानाच बुधवारी अनेक भागात वळवाच्या पावसाने विजेच्या कडकडाटात आणि जोरदार वाऱ्यासह हजेरी लावली. यामध्ये नुकसानीच्या घटना अधिक घडल्या. सातारा जिल्हा परिषद आवारात झाड कोसळून १० गाड्यांचे नुकसान झाले. तर खटाव तालुक्यात वीज पडून एक गाय आणि सातारा तालुक्यात १८ शेळ्या-मेंढ्यांचा मृत्यू झाला. यामुळे प्रशासनाने सतर्कतेचे आवाहन केले आहे.

सातारा जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून पारा वाढला होता. उष्णतेची लाट आल्या सारखीच स्थिती होती. त्यातच मंगळवारी ४१.७ अंशाची नोंद झाली. हे या वर्षातील उच्चांकी कमाल तापमान ठरले. त्यातच कडक उन्हाळा आणि उष्णतेची लाट निर्माण झाल्याने अंगाची लाहीलाही होत होती. त्यामुळे कधी एकदा वळवाचा पाऊस पडतो अशी स्थिती होती. अशातच बुधवारी दुपारच्या सुमारास सातारा शहरात आभाळ भरून आले. चार वाजण्याच्या सुमारास तर वाऱ्यासह पाऊस पडू लागला. यामुळे नागरिकांची धावपळ उडाली. क्षणार्धात पावसामुळे रस्त्यावरुन पाण्याचे लोट वाहू लागले. यावेळी वाऱ्यामुळे सातारा जिल्हा परिषदेच्या आवारातील एक झाड कोसळले. दुचाकीसाठी पार्किंग असणाऱ्या ठिकाणीच झाड पडले. त्यामुळे झाडाखाली ८ ते १० दुचाकी सापडल्या. त्यातील चार गाड्यांचे पूर्ण नुकसान झालेले आहे. तर इतर दुचाकींचेपार्ट फुटले, तुटले आहेत. शहरातील या पावसामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. रात्री उशिरापर्यंत विजेची ये-जा सुरू होती. त्यामुळे सातारकरांना अंधारात बसावे लागले.

पेडगाव येथे देशी गाय ठार...

खटाव तालुक्यातही बुधवारी पाऊस झाला. तसेच पेडगाव येथे एका घराजवळ वीज कोसळली. यामध्ये एक देशी गाय ठार झाली. तर सातारा शहराजवळ कोंडवे गाव आहे. कोंडवे येथेही वीज पशुधनावर कोसळली. यामध्ये १९ शेळ्या, एक बोकड आणि ७ मेढ्यांचा जागीच मृत्यू झाला. यामुळे माण तालुक्यातील पळसावडे येथील मेंढपाळाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, वीज पडून पशुधनाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच पशुसंवर्धन विभागाचे जिल्हा उपायुक्त डाॅ. दिनकर बोर्डे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना घटनास्थळी जाऊन पंचनामा करण्याची सूचना केली. त्यामुळे वेळीच यंत्रणा घटनास्थळी पोहोचली.

Web Title: rain strong winds in satara 10 two wheeler damaged after tree falls in ZP premises