सांगलीत वंचितच्या कार्यकर्त्यांनी खासगी रुग्णालय फोडले, पोलिसांनी १७ जणांना घेतले ताब्यात

By संतोष भिसे | Updated: June 3, 2025 18:00 IST2025-06-03T17:59:37+5:302025-06-03T18:00:24+5:30

हातात हॉकी स्टीक घेतलेले कार्यकर्ते दिसेल त्या साहित्याची तोडफोड करत सुटले होते

Vanchit activists vandalize a private hospital in Sangli | सांगलीत वंचितच्या कार्यकर्त्यांनी खासगी रुग्णालय फोडले, पोलिसांनी १७ जणांना घेतले ताब्यात

सांगलीत वंचितच्या कार्यकर्त्यांनी खासगी रुग्णालय फोडले, पोलिसांनी १७ जणांना घेतले ताब्यात

संतोष भिसे

सांगली : कामगार विमा योजनेअंतर्गत उपचार घेणाऱ्या रुग्णाकडून घेतले जात असल्याचा आरोप करत खासगी रुग्णालयाची प्रचंड तोडफोड करण्यात आली. सांगलीत विश्रामबागमध्ये मंगळवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. वंचित बहुजन आघाडीच्या २५ ते ३० कार्यकर्त्यांनी आदित्य मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात धिंगाणा घातला. 

याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शंकर माने यांच्यासह १७ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. आज दुपारी रुग्णालयाचे दैनंदि कामकाज सुरु असताना हे कार्यकर्ते हातात निळे झेंडे घेऊन अचानक रुग्णालयात घुसले. स्वागतकक्षापासूनच तोडफोड सुरु केली. हातात हॉकी स्टीक घेतलेले कार्यकर्ते दिसेल त्या साहित्याची तोडफोड करत सुटले होते. काही कर्मचाऱ्यांनी त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला, मात्र कार्यकर्ते आक्रमक होते. त्यांनी स्वागतकक्ष फोडला. सोनोग्राफी कक्षात तोडफोड केली. तीन ते चार संगणकांची नासधूस केली. 

तळमजल्यावर धिंगाणा घातल्यानंतर त्यांनी पहिल्या मजल्यावर चाल केली. तेथेही नासधूस केली. त्यामुळे सर्वत्र काचांचा सडा पडला होता. त्यानंतर कार्यकर्ते दुसऱ्या मजल्याकडे धावले. तेथे आंतररुग्ण विभागात अनेक रुग्ण उपचार घेत होते. कार्यकर्त्यांचा पवित्रा लक्षात घेऊन रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी ताबडतोब दाराला कुलूप लावून घेतले. त्यामुळे कार्यकर्ते खाली उतरले व निघून गेले. 

कार्यकर्त्यांनी आरोप केला की, कामगार विमा योजनेतून रुग्णालयात विनाशुल्क उपचार करणे आवश्यक आहे, पण या ठिकाणी रुग्णांकडून पैसे घेण्यात येतात. गोरगबीर रुग्णांकडून अशाप्रकारे पैसे उकळण्याचा प्रकार सहन केला जाणार नाही. 

दरम्यान, विश्रामबाग पोलिस ठाण्याचे निरिक्षक सुधीर भालेराव पथकासह घटनास्थळी तातडीने पोहोचले. त्यांनी कार्यकर्त्यांची धरपकड केली. कायदा हाती घेण्याचा प्रकार कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही असा इशारा दिला. रुग्णालयाच्या कामकाजाविषयी आक्षेप असतील, तर कायदेशिर मार्गाने जावे, अशी तोडफोड केल्यास कडक कारवाई करु असाही इशारा दिला. दरम्यान, धरपकड केलेल्या कार्यकर्त्यांना विश्रामबाग पोलिस ठाण्यात बसवून ठेवले होते. त्यांच्याविरोधात रुग्णालय प्रशासनाकडून तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया सायंकाळपर्यंत सुरु होती.

Web Title: Vanchit activists vandalize a private hospital in Sangli