धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 00:18 IST2026-04-20T00:17:01+5:302026-04-20T00:18:59+5:30
दोन वर्षांअगोदर महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग, न ऐकणाऱ्या तरुणींना धमकी

धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
योगेश पांडे - नागपूर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : धार्मिक चालीरितींचे पालन करण्यासाठी दबाव आणत कर्मचारी तरुणींना धमकी देण्यात आल्याचा प्रकार एका स्वयंसेवी संस्थेत समोर आला आहे. या प्रकरणातील आरोपी एनजीओ चालकाने एका तरुणीचा दोन वर्षांअगोदर कार्यालयात विनयभंगदेखील केला होता. चालीरितींचे पालन करण्यास नकार देल्यावर धमकीदेखील दिल्याचा आरोप तरुणींनी केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी एनजीओ चालकाला अटक केली असून या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
रियाझ काझी असे संबंधित आरोपीचे नाव असून तो 'फिकर फाऊंडेशन व पढे हम पढाए हम' या नावांनी स्वयंसेवी संस्था चालवतो. त्याच्या संस्थेत काही कर्मचारी कामाला आहेत. त्यात काही तरुणींचादेखील समावेश आहे. जुलै २०२४ मध्ये त्याने एनजीओमध्ये काम करणाऱ्या एका तरुणीचा विनयभंग केला होता. तरुणीने त्याला समज दिली होती, मात्र तरीदेखील तो वारंवार तिची छेडखानी काढत होता. दरम्यान, त्याच्या कार्यालयातील तरुणींना तो वारंवार त्याच्याशी निगडीत धार्मिक चालीरितींची माहिती द्यायचा. तो पालन करत असलेला धर्म किती चांगला आहे असे सांगून त्यांनादेखील चालीरितींचे पालन करायला सांगायचा.
त्याच्या वागण्याला कंटाळून काही तरुणींनी नोकरीदेखील सोडली. काही दिवसांअगोदर त्याने काम सोडून गेलेल्या एका तरुणीच्या आईला फोन केला व इतर मुलींविषयी आक्षेपार्ह भाषेचा वापर केला. हा प्रकार कळताच तरुणी एकत्रित आल्या व थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्याच्याविरोधात तक्रार झाल्यानंतर पोलिसांनी प्रकरण गंभीरतेने घेतले व चौकशीला सुरुवात केली. तेव्हा त्याने धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा दबाव आणल्याची बाब समोर आली. पोलिसांनी रियाझ काझीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला रात्रीच अटक केली. त्याला रविवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला २३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यासंदर्भात मानकापूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार हरीश काळसेकर यांना विचारणा केली असता त्यांनी अटक झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.
चार तरुणींचा मानसिक छळ
रियाझ काझी बऱ्याच कालावधीपासून त्याच्याकडे काम करणाऱ्या तरुणींचा मानसिक छळ करत होता. त्याच्या गोष्टींना दाद न देणाऱ्या तरुणींना त्याने नोकरीवरून काढून टाकण्याची व त्यांचे वाईट करण्याची धमकीदेखील दिली होती. त्याने कुटुंबियांनादेखील पाहून घेण्याची धमकी दिल्याची तक्रारदेखील तरुणींनी केली आहे. रियाझसोबत आणखी कुणी त्याच्यासोबत सहभागी होते का याचा तपास सुरू आहे. तसेच त्याने इतरही कोणत्या तरुणींवर अशा प्रकारे दबाव आणला होता का या दिशेनेदेखील चौकशी सुरू आहे.