सांगली-सातारच्या रणांगणात महायुतीतच रस्सीखेच; चार वर्षांनंतर निवडणुकीचा बिगुल, इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 18:22 IST2026-05-19T18:20:32+5:302026-05-19T18:22:57+5:30
स्थानिक आघाड्यांना महत्त्व

सांगली-सातारच्या रणांगणात महायुतीतच रस्सीखेच; चार वर्षांनंतर निवडणुकीचा बिगुल, इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू
शीतल पाटील
सांगली : सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा चार वर्षांनंतर अखेर बिगुल वाजला असून, जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. निवडणुकीची घोषणा होताच इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून, महायुतीतील घटक पक्षांमध्ये उमेदवारीवरून जोरदार रस्सीखेच होण्याची चिन्हे आहेत. या मतदारसंघावर स्थापनेपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील संख्याबळाच्या जोरावर या आघाडीने अनेक वर्षे सत्ता टिकवून ठेवली. मात्र बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे यावेळी पहिल्यांदाच महायुतीला हा मतदारसंघ आपल्या बाजूने खेचून आणण्याची संधी निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
या मतदारसंघाचे आमदार मोहनराव कदम यांची मुदत मे २०२२ मध्ये संपली होती. त्यानंतर चार वर्षांनी सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक जाहीर झाली. आतापर्यंत सहकारमहर्षी विष्णूअण्णा पाटील, मदनभाऊ पाटील, विलासराव शिंदे, मोहनराव कदम या जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. मतदारसंघाच्या स्थापनेपासून सांगली जिल्ह्याचेच वर्चस्व राहिले आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणूनही मतदारसंघाची ओळख होती. पण, गेल्या दशकभरातील बदललेल्या राजकीय परिस्थितीत मतदारसंघातील गणिते बदलली आहेत.
भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस (अजित पवार) यांच्यात जागावाटप आणि उमेदवारीवरून अंतर्गत चुरस वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. प्रत्येक पक्ष आपला उमेदवार रिंगणात उतरवण्यासाठी प्रयत्नशील असल्याने महायुतीत एकमत होणार का, याकडे लक्ष लागले आहे. महायुतीत बिघाडी झाल्यास निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याची शक्यता राजकीय जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.
दुसरीकडे महाविकास आघाडीही ही जागा कायम राखण्यासाठी रणनीती आखत असून, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार)कडून हालचालींना वेग आला आहे. स्थानिक पातळीवरील नाराजी, पक्षांतर आणि मतदारसंघातील बदलती राजकीय गणिते यामुळे यंदाची निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. निवडणुकीची आचारसंहिता लागू होताच इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांत सांगली-साताऱ्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोप आणि राजकीय घडामोडींना अधिक वेग येण्याची शक्यता आहे.
भाजपमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी
या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी भाजपमध्ये इच्छुकांची संख्या मोठी आहे. सांगलीतून माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, मकरंद देशपांडे, नीता केळकर यांची नावे चर्चेत आहेत. शिवाय साताऱ्यातून अनेकजण इच्छुक आहेत. त्यामुळे उमेदवारी सांगलीला की साताऱ्याला याची उत्सुकता लागली आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेस (अजित पवार)चे नेते माजी खासदार संजय पाटील यांच्या नावाची चर्चा आहे.
स्थानिक आघाड्यांना महत्त्व
या निवडणुकीत नगरपालिका, नगरपंचायतीतील स्थानिक आघाड्यांना महत्त्व आले आहे. तासगावमधील माजी खासदार संजय पाटील यांच्या विकास आघाडीचे १६, खानापूरमधील स्थानिक आघाडी ८, कवठेमहांकाळच्या शेतकरी विकास पॅनेल ६, तर आटपाडीतील तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडे १ सदस्य संख्या आहे. या आघाड्या कुणाच्या पारड्यात वजन टाकतात, याकडे लक्ष लागले आहे.
नगरसेवकांचे चेहरे फुलले
महापालिका, नगर परिषदांच्या निवडणुका होऊन पाच ते सहा महिने झाले, तरी विकासकामे ठप्पच आहेत. निवडणुकीत केलेल्या खर्चाचा हिशेब अजूनही सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची घोषणा होताच अनेक नगरसेवकांचे चेहरे फुलले होते. किमान पदरात काहीतरी पडेल, अशी आशा त्यांना लागली आहे.
जिल्ह्यातील पक्षनिहाय संख्याबळ (महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद)
- भाजप : १००
- काँग्रेस : ५९
- राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) : ३८
- राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) ९६
- शिंदेसेना : ६१
- उद्धवसेना : १
- जनसुराज्य : १
- रयत क्रांती आघाडी : १
- अपक्ष : ३