Sangli News: छळाला कंटाळून हळ्ळीत विवाहितेची आत्महत्या?; पती, सासू व नणंदेविरोधात गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 19:14 IST2026-05-16T19:13:54+5:302026-05-16T19:14:20+5:30
नातेवाइकांकडून घातपाताचा संशय

Sangli News: छळाला कंटाळून हळ्ळीत विवाहितेची आत्महत्या?; पती, सासू व नणंदेविरोधात गुन्हा
उमदी : हळ्ळी (ता. जत) येथे विवाहित महिलेचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याच्या घटनेला गंभीर वळण मिळाले असून, मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून आत्महत्या केल्याप्रकरणी पती, सासू व नणंदेविरोधात उमदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे जत तालुक्यात खळबळ उडाली आहे.
लक्ष्मी शिवानंद मांग (वय ३४) असे मृत विवाहितेचे नाव असून, तिची आई रेखा केंचाप्पा इंगळे (रा. मरवडे, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार शिवानंद मलकारी मांग, शकुंतला मलकारी मांग आणि सविता मलकारी केंगार (रा. हळ्ळी, ता. जत) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मीचा विवाह २०१२ मध्ये शिवानंद मांग याच्याशी झाला होता. सुरुवातीला संसार सुरळीत होता. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून पतीकडून मारहाण व मानसिक छळ होत असल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. तसेच सासू व नणंदेकडूनही त्रास दिला जात असल्याचे लक्ष्मीने माहेरी व फोनवरून सांगितल्याचा उल्लेख आहे.
दि. १३ मे रोजी रात्री सासूकडून “तुझ्या मुलीला घेऊन जा,” असा फोन आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर १४ मे रोजी सकाळी दोन्ही कुटुंबीय व ग्रामस्थांच्या उपस्थितीत चर्चा झाली. गावातील पंचांनी समजूत काढत लक्ष्मीला नीट नांदवण्याचा सल्ला दिला होता. मात्र, त्याच दिवशी सायंकाळी लक्ष्मी विहिरीत पडून मृत झाल्याची घटना उघडकीस आली. तिला तत्काळ उमदी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले.
सीसीटीव्ही देखरेखीखाली शवविच्छेदन
हा आत्महत्येचा प्रकार नसून घातपात असल्याचा संशय नातेवाइकांनी व्यक्त केला. त्यामुळे उमदी व जत येथे शवविच्छेदनास विरोध करत मृतदेह मिरज शासकीय रुग्णालयात हलविण्यात आला. तेथे सीसीटीव्ही देखरेखीखाली शवविच्छेदन करण्यात आले. लक्ष्मीच्या पश्चात दोन मुलगे व एक मुलगी असून, मातृछत्र हरपल्याने कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
कारवाईसाठी पोलिस ठाण्यासमोर ठिय्या
घटनेनंतर नातेवाइकांनी उमदी पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन करत संशयितांविरोधात कठोर कारवाईची मागणी केली. पोलिसांनी समजूत काढल्यानंतर तणाव निवळला. हळ्ळी येथे कडेकोट पोलिस बंदोबस्तात अंत्यसंस्कार पार पडले असून पुढील तपास उमदी पोलिस करत आहेत.