Fuel Shortage: मंत्री चंद्रकांतदादांनी घटविला वाहनांचा ताफा; गोपीचंद पडळकर आले ई स्कूटरवरून

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 12:35 IST2026-05-14T12:33:05+5:302026-05-14T12:35:45+5:30

'मंत्र्यांचे भत्तेही बंद करावेत'

Guardian Minister Chandrakant Patil reduced the number of vehicles in the convoy On the other hand, MLA Gopichand Padalkar travelled on an e-scooter | Fuel Shortage: मंत्री चंद्रकांतदादांनी घटविला वाहनांचा ताफा; गोपीचंद पडळकर आले ई स्कूटरवरून

छाया: सुरेंद्र दुपटे

सांगली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या काटकसरीच्या आवाहनास मंत्री प्रतिसाद देतील का, असा सवाल उपस्थित करीत ‘लोकमत’ने बुधवारी वृत्त प्रसिद्ध केले. त्याचा सकारात्मक परिणाम मंत्र्यांच्या दौऱ्यात दिसून आला. जिल्हा दौऱ्यावर आलेल्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ताफ्यातील एक गाडी कमी करीत अल्पशी बचत केली. दुसरीकडे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी चारचाकी वाहन टाळून सभेला ई स्कूटरवरून प्रवास करीत उपस्थिती लावली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला इंधनाच्या बाबतीत काटकसरीचे आवाहन केले आहे. त्या पार्श्वभूमीवर मंत्र्यांच्या दौऱ्यावर होणारा लाखो रुपयांचा चुराडा अन् इंधनावर होणारा अमाप खर्च यावर ‘लोकमत’ने प्रकाशझोत टाकला होता. मंत्र्यांकडून पंतप्रधानांच्या आवाहनास कसा प्रतिसाद मिळणार याबाबत उत्सुकता होती.

बुधवारी सांगली जिल्हा दौऱ्यावर आलेले चंद्रकांत पाटील यांनी याची दखल घेत ताफ्यातील एक वाहन कमी करण्याची सूचना पोलिस प्रशासनाला दिली. त्यानुसार मिरज रेल्वे स्थानक ते मिरज विश्रामगृह, तिथून जिल्हाधिकारी कार्यालयात येताना त्यांच्या ताफ्यात दोनच वाहने होती. जिल्हा नियोजन समितीच्या सभेला जिल्ह्यातील आलेल्या सदस्यांच्या वाहनांची गर्दी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात दिसत होती.

अन्य आमदार चारचाकीत, पडळकर दुचाकीवर

जिल्ह्यातील आमदारांनी जिल्हा नियोजन समितीच्या सभेला चारचाकीतून येत हजेरी लावली. गोपीचंद पडळकरांनी मात्र, ई स्कूटरवरुन सवारी करीत सभेला उपस्थिती लावली. सांगलीच्या सर्किट हाउसपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पाच किलोमीटर अंतरात त्यांनी ई स्कूटरचा वापर केला.

जयंत पाटील यांच्याकडून निशाणा

राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवरून सत्ताधारी मंत्र्यांवर निशाणा साधला. ‘मध्यमवर्गीयांना काटकसर ही काही नवी गोष्ट नाही. त्यामुळे कर्तव्य म्हणून याही वेळेला ते साथ देतीलच. पण, २० ते ३० गाड्यांचा ताफा वापरणाऱ्या मंत्र्यांचे काय? आपल्या राज्यात सत्ताधारी पक्षाचे आमदार डझनभर गाड्यांचा ताफा व सुरक्षा घेऊन फिरताहेत. पंतप्रधानांचा आदेश शीर्ष मानून मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्यांची संख्या कमी करावी. फक्त एक गाडी व एक अंगरक्षक द्यावा,’ अशी पोस्ट त्यांनी केली.

मंत्र्यांचे भत्तेही बंद करावेत

जयंत पाटील यांनी पोस्ट टाकल्यानंतर त्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. पोस्टला प्रतिसाद देत काहींनी मंत्र्यांचे भत्तेही बंद करावेत, अशी मागणी केली. काहींनी जयंत पाटील यांनाही सल्ला देत त्यांनीही काटकसर करून दाखवावी, असे मत मांडले.

Web Title: Guardian Minister Chandrakant Patil reduced the number of vehicles in the convoy On the other hand, MLA Gopichand Padalkar travelled on an e-scooter