Sangli-temple wall collapses: मोटेवाडी दुर्घटनेत सहाजणांच्या मृत्यूप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 12:21 IST2026-05-14T12:20:48+5:302026-05-14T12:21:10+5:30
निकृष्ट बांधकामामुळे बळी गेल्याचा ठपका

Sangli-temple wall collapses: मोटेवाडी दुर्घटनेत सहाजणांच्या मृत्यूप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल
उमदी : मोटेवाडी (ता. जत) येथील मरगुबाई मंदिर परिसरातील शेडची भिंत कोसळून सहाजणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी उमदी पोलिसांनी निकृष्ठ बांधकाम केल्याबद्दल चौघांविरुद्ध सदोष मनुष्यवधासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी पोलिस कर्मचारी लक्ष्मण बबन बंडगर यांनी उमदी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. निकृष्ट दर्जाचे बांधकाम, कमी दर्जाचा वापरलेला माल व तांत्रिकदृष्ट्या अयोग्य शेड उभारल्याप्रकरणी कोंडिबा सुबराव केसकर (रा. पांडोझरी, ता. जत), आप्पासाहेब धुळा केसकर (रा. मोटेवाडी, ता. जत), सुनील रावसाहेब जावीर (रा. मोटेवाडी, ता. जत) व किसन पूर्ण नाव माहिती नाही (रा. संख, ता. जत) यांच्याविरोधात कलम १०६, १२५ व १२५ (ब) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
मंगळवारी दि. १२ मे रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास मोटेवाडी गावच्या हद्दीतील मरगुबाई मंदिरामागील पत्र्याच्या शेडमध्ये भाविक थांबले होते. यावेळी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे शेड व भिंत कोसळली. यात सहाजण जागीच ठार तर १३ जण जखमी झाले होते. याप्रकरणी चौकशी केल्यानंतर पोलिसांनी निकृष्ट बांधकामाबाबत चौघांवर गुन्हा दाखल केला. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक बिरप्पा लातुरे करीत आहेत.
जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू
या दुर्घटनेत मंगल भाऊसाहेब मोटे, संगीता रामगोंडा चौधरी, शंकर आबा लोखंडे, अरुण विजयकुमार गेजगे, सोन्या लक्ष्मण रोजगे व कोंडिबा राऊबा गेजगे यांचा मृत्यू झाला, तर दऱ्याप्पा कोकरे, मुरसिद्ध पुजारी, मरिबा कोकरे, बिरू मोटे, सुभाष गडदे, शांता लोखंडे, उमेश लोखंडे, रमेश लोखंडे यांच्यासह १३ जण जखमी झाले आहेत. जखमींवर जत ,सांगली, मिरज, विजापूर येथील विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.