मेट्रोसाठी स्वारगेट-कात्रज बीआरटी मार्गावर गंडांतर ? बसथांबे काढण्याचे काम सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2026 11:17 IST2026-04-26T11:17:00+5:302026-04-26T11:17:56+5:30
-सध्या वनाज ते रामवाडी आणि स्वारगेट ते पिंपरी असे दोन मेट्रो मार्ग कार्यान्वित आहेत, तर स्वारगेट ते कात्रज या दरम्यान भूमिगत मेट्रो मार्गाचे काम लवकरच सुरू होणार

मेट्रोसाठी स्वारगेट-कात्रज बीआरटी मार्गावर गंडांतर ? बसथांबे काढण्याचे काम सुरू
पुणे : स्वारगेट ते कात्रज दरम्यानच्या प्रस्तावित भूमिगत मेट्रो मार्गासाठी स्वारगेट ते कात्रज या दरम्यानच्या बीआरटी मार्गावर गंडांतर आले असून, या मार्गावरील बीआरटी बसथांबे काढण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
शहरातील सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी मेट्रो प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. सध्या वनाज ते रामवाडी आणि स्वारगेट ते पिंपरी असे दोन मेट्रो मार्ग कार्यान्वित आहेत, तर स्वारगेट ते कात्रज या दरम्यान भूमिगत मेट्रो मार्गाचे काम लवकरच सुरू होणार आहे. स्वारगेट ते कात्रज या नियोजित मेट्रो मार्गात मार्केट यार्ड, बिबवेवाडी, पद्मावती, बालाजीनगर आणि कात्रज या पाच स्थानकांचा समावेश आहे. या मेट्रो स्थानकांपैकी बिबवेवाडी, पद्मावती आणि बालाजीनगर ही तीन स्थानके बीआरटी बसथांब्यांच्या परिसरात येत असल्याने तेथील बीआरटी मार्गिका व स्थानके हटवावी लागणार आहेत.
त्यानुसार शाहू कॉलनी-नातूबाग येथील बीआरटी थांबा काढण्याचे काम गेल्या दोन दिवसांपासून सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, मेट्रोसाठी तीन बीआरटी स्थानके हटविल्यानंतर पंचमी, भापकर पेट्रोल पंप (सिटी प्राइड), शंकर महाराज मठ आणि भारती विद्यापीठ ही बीआरटी स्थानके कायम राहणार आहेत. त्यामुळे बीआरटी सेवा तुकड्या-तुकड्यांत मिळणार की संपूर्ण बीआरटी मार्गाचे अस्तित्व संपणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.