धायरी : नसरापूर येथील चिमुकलीवर झालेल्या अमानवीय अत्याचाराच्या आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणाच्या तपासाची सद्य:स्थिती आणि कारवाईबाबत माहिती देण्यासाठी पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी धायरी येथे सोमवारी पीडित कुटुंबीयांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
कुटुंबीयांशी संवाद साधताना पोलिस अधीक्षक गिल यांनी आतापर्यंत झालेल्या तपासाचा आढावा सांगितला. या दुर्दैवी घटनेचा तपास पोलिस यंत्रणा अत्यंत गांभीर्याने आणि प्राधान्याने करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, ‘आम्ही या घटनेची अत्यंत गंभीर दखल घेतली असून, हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. लवकरात लवकर दोषारोपपत्र दाखल करून आरोपीला लवकरात लवकर आणि जास्तीत जास्त कठोर शिक्षा मिळवून देण्यासाठी प्रशासन आणि शासन पूर्णपणे कटिबद्ध आहे. या कायदेशीर प्रक्रियेत आम्हाला निश्चितच यश मिळेल, असा विश्वास ठेवा. शासन आणि पोलिस यंत्रणेने याप्रकरणी अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. आरोपीला कुठलाही थारा दिला जाणार नाही आणि न्याय प्रक्रियेत कोणताही विलंब होणार नाही, याची ग्वाही पोलिस अधीक्षक गिल यांनी दिली.
तपासासाठी तज्ज्ञ अधिकाऱ्यांचे विशेष पथक
पुणे ग्रामीण पोलिसांनी या गुन्ह्याच्या तपासासाठी विशेष पथकाची नेमणूक केली आहे. या पथकात अनुभवी पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तपासात कोणत्याही त्रुटी राहू नयेत आणि पीडितेला लवकरात लवकर न्याय मिळावा, या उद्देशाने हे पथक काम करणार आहे. महिला आणि बालकांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांची संवेदनशीलता लक्षात घेऊन, या विशेष पथकात २ महिला पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे पीडित कुटुंबाशी संवाद साधणे आणि गुन्ह्यातील तांत्रिक पैलू समजून घेणे सोपे जाणार आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हे पथक गुन्ह्याचा सविस्तर पंचनामा, पुराव्यांचे संकलन आणि आरोपीविरुद्ध सबळ पुरावे गोळा करण्याचे काम करील.
Web Summary : Police are seriously investigating the Nasrapur atrocity case, committed to a fast-track trial and severe punishment for the accused. A special investigation team has been formed to ensure justice.
Web Summary : पुलिस नसरापुर अत्याचार मामले की गंभीरता से जांच कर रही है, फास्ट-ट्रैक ट्रायल और आरोपी के लिए कड़ी सजा के लिए प्रतिबद्ध है। न्याय सुनिश्चित करने के लिए एक विशेष जांच दल का गठन किया गया है।