Join us
Daily Top 2Weekly Top 5

एमजीआर, एनटीआर ते विजय... दक्षिणेतील मतदार अभिनेत्यांमध्ये नेता का शोधतात? ही आहेत ५ कारणं

By बाळकृष्ण परब | Updated: May 5, 2026 13:08 IST

1 / 7
काल लागलेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये तामिळनाडूचा निकाल सर्वात लक्षवेधी ठरला. येथे पहिल्यांदाच निवडणूक लढवत असलेला अभिनेता विजय याचा टीव्हीके हा पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला. त्यामुळे गेल्या पन्नास वर्षांपासून द्रमुक आणि अण्णा द्रमुक या पक्षांभोवती फिरत असलेल्या तामिळनाडूतील राजकारणाला एक नवा पर्याय मिळाला.
2 / 7
तामिळनाडूत टीव्हीके पक्षाने सुमारे १०७ जागा जिंकल्याने आता राज्यात विजय हा मुख्यमंत्री होणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे. दरम्यान, तामिळनाडूमध्ये विजयच्या पक्षाला मिळालेल्या यशानंतर दक्षिणेतील राज्यातील मतदार हे कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या सिने अभिनेत्यांमध्येच आपला नेता का शोधतात, तसेच त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्या हाती सत्ता कशी काय सोपवतात, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. अगदी एम. जी. रामचंद्रन, एन. टी. रामाराव यांच्यापासून ते काल विजय मिळवणाऱ्या विजयपर्यंत अनेक अभिनेते हे दक्षिणेत प्रभावी नेते म्हणून उदयास आले आहेत. या पार्श्वभूमीवर दक्षिणेतील मतदार ने अभिनेत्यांमध्ये नेत्याचा शोध का घेतात याचा घेतलेला हा आढावा.
3 / 7
दक्षिणेतील अनेक चित्रपटात नायक हा अन्यायाविरुद्ध लढणारा, गरीब, पीडितांसाठी अत्याचाऱ्यांविरोधात लढा पुकारणारा या स्वरूपात दाखवला. आधीच्या काळात एम. जी रामचंद्रन, एन. टी. रामाराव असो वा हल्लीचा विजय असो, या सर्वांनी पडद्यावर अन्यायाविरोधात लढणाऱ्या नायकाची प्रतिमा साकारली होती. त्यामुळे पडद्यावरील हे फिल्मी नायक प्रत्यक्षातही असेच नेते ठरतील, असा चाहत्यांचा भाबडा समज असतो. त्यातूनच मतदार या अभिनेत्यांच्या मागे उभे राहतात.
4 / 7
दक्षिणेतील अभिनेत्यांचे मोठमोठे आणि प्रभावी फॅन क्लब असतात. या फॅन क्लबच्या माध्यमातून वेगवेगळी सामाजिक कामे केली जातात. केवळ चित्रपट प्रदर्शित होतानाच नव्हे तर इतर वेळीही हे फॅन क्लब सक्रिय असतात. त्यामुळेच जेव्हा एखादा अभिनेता राजकीय पक्ष काढण्याची घोषणा करतो. तेव्हा हे फॅन क्लबमधील चाहते त्या राजकीय पक्षाचे कार्यकर्ते बनतात.
5 / 7
दक्षिणेतील इतर राज्यांच्या तुलनेत तामिळनाडूच्या राजकारणात प्रादेशिक अस्मिता आणि द्रविडी चळवळीचा कमालीचा प्रभाव आहे. सुरुवातीच्या काळात डीएमकेसारख्या पक्षांनी आपली विचारधारा जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी चित्रपटांचा प्रभावीपणे वापर केला होता. एमजीआर यांनीही याच माध्यमातून आपली ओळख निर्माण केली होती. तसेच काल विजयी झालेला अभिनेता जोसेफ विजय यानेही आपली प्रतिमा अशाच नायकाची उभी केली होती. त्यामुळे इतर भागात चित्रपट हे मनोरंजनाचे साधन असले तरी तामिळनाडूतील जनतेसाठी तामिळ संस्कृतीचा आणि अस्मितेचा भाग आहेत.
6 / 7
दक्षिणेतील चित्रपट तुम्ही पाहिले तर त्यामध्ये तुम्हाला नायकांची प्रभावी संवादफेक दिसून येते. या संवादांच्या जोरावर ते समोरच्या चाहत्यांच्या मनाचा ठाव घेतात. तसेच चित्रपट पाहणाऱ्या चाहत्यांसाठीही हे अभिनेते म्हणजे आपल्यासाठी आवाज उठवणारे खरेखुरे नायक वाटू लागतात. त्यामुळे अभिनेत्यांची ही संवादफेक सर्वसामान्य नेत्यांच्या तुलनेत लोकांशी अधिक जोडून घेणारी ठरते. तसेच चित्रपटांमधून दैनंदिन जीवन, समाजव्यवस्था आणि राजकीय व्यवस्थेवर केलेलं भाष्य चाहत्यांना अधिक जोडून घेणारं ठरतं.
7 / 7
देशातील इतर भागांप्रमाणेच दक्षिणेतील राजकारणातही जातीपातींचा प्रभाव दिसून येतो. मात्र अभिनेत्यांचा चाहतावर्ग हा वेगवेगळ्या जातीधर्मात पसरलेला असतो. त्यामुळे सर्वसमावेशक चेहरा असलेल्या अशा अभिनेत्यााला नेता मानून जनता त्याच्याकडे सहज आकर्षित होते.
टॅग्स :विधानसभा निवडणूक निकाल २०२६तामिळनाडूथलापती विजय